बुद्ध पौर्णिमा एक केवळ धार्मिक दिवस नव्हे, तर सामाजिक सजगतेची जाणीव

बुद्ध पौर्णिमा निमित्त रुग्णांना फळे वाटप;समतेच्या मार्गावर चालणारे तरुण हात झाले सक्रीय..
लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 
प्रतिनिधी – सचिन कांबळे,

बुद्ध पौर्णिमा म्हणजे भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण यांचा त्रिसंगम. हा दिवस जगाला तत्त्वज्ञान, करुणा, अहिंसा आणि समतेचा संदेश देतो. पण केवळ ध्यानधारणा,पूजा आणि औपचारिकतेत अडकून न पडता, त्या विचारांचे कृतीत रूपांतर करणे — हाच खरा बौद्ध तत्वज्ञानाचा आत्मा आहे.

आलापल्ली येथील संघमित्रा बुद्ध विहारात बुद्ध पौर्णिमा साजरी करताना जो उपक्रम राबविण्यात आला — उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे गरजवंत रुग्णांना फळवाटपाचा — तो याच तत्त्वज्ञानाच्या कृतीशील अंगाचे प्रतीक आहे. नागसेन बुद्ध विहार,जय भीम युवा मंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सहकार्याने केलेला हा साधा वाटणारा पण खोल सामाजिक अर्थ असलेला उपक्रम, आजच्या तरुणाईसाठी एक आदर्श ठरावा.

कारण बुद्धांचा मार्ग केवळ वैयक्तिक मुक्तीसाठी नसून, समाजाच्या सर्व स्तरांतील दुर्बल घटकांप्रती करुणा व कृतीच्या भूमिकेवर आधारित आहे. बुद्धांनी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ ही संकल्पना मांडली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ती लोकशाही समाजरचनेच्या केंद्रस्थानी आणली. आज त्यांच्या विचारांचे बीज पेरणाऱ्या युवकांच्या कृतीतून ही विचारशृंखला पुढे जाताना दिसते, हे निश्चितच आश्वासक आहे.

फळवाटप ही क्रिया क्षणिक वाटू शकते, पण त्यातून जो आत्मसन्मान, माणुसकीचा स्पर्श आणि सामाजिक जवळीक निर्माण होते, तो कुठल्याही भाषणापेक्षा प्रभावी असतो. समाजाच्या वंचित वर्गाप्रती संवेदना बाळगणारी ही पिढी उद्याचे नेतृत्व करेल, तर सामाजिक न्याय आणि समता ही केवळ संविधानातील तत्त्व न राहता, जगण्याची प्रत्यक्ष दिशा ठरेल.

समाजात असलेले दुःख केवळ पाहण्यापुरते न ठेवता, त्याच्या निवारणासाठी स्वतः पुढे येणाऱ्या अशा ‘करुणामयी कृती’ हीच खरी बौद्ध परंपरेची शान आहे.

या प्रसंगी ओमसाई कोंडगोर्ले, पंकज तावाडे, अनिल मुरमाडे, केशव रामटेके, सहर्ष निमसरकार, केशव रामटेके, आर्यन झाडे, निखिल रत्नंम, सिद्धार्थ करमे, निहाल झाडे, आशिष साखरकर, कौशल म्हशाखेत्री, निर्भय, प्रज्वल अलोने यांच्यासह गावातील बौद्ध उपासक,उपासीका यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

 

 

 

अहिंसाकरुणाजय भीम युवा मंडळज्ञानप्राप्तीडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती..तत्त्वज्ञाननागसेन बुद्ध विहारबुद्ध पौर्णिमाभगवान गौतम बुद्धांचा जन्ममहापरिनिर्वाण यांचा त्रिसंगम.समतेचा संदेश .