शासकीय यंत्रणेला गती, शिबिराला भेट, कामांची माहिती घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आढावा घेत दिले आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, १९ जून : एटापल्ली तालुक्यातील प्रशासनाला अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी काल तालुक्याला भेट देत संपूर्ण यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, कृषी आणि पावसाळी तयारीसह विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी कशी सुरू आहे याची थेट माहिती घेत, अधिकाऱ्यांना आपसी समन्वय साधत कामे वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.

उपविभागीय कार्यालयात झालेल्या या बैठकीस उपविभागीय अधिकारी नमन गोयल, तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांच्यासह प्रमुख तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी वनहक्क कायद्यांतर्गत प्रलंबित दावे तातडीने निकाली काढण्याचे आदेश देत, वनहक्क पट्टाधारकांना शासकीय योजनांचा प्राधान्याने लाभ देण्याचे निर्देश दिले. कृषी विभागाला गरजू शेतकऱ्यांना बोअरवेल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

पावसाळा तोंडावर असताना आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश देत, ग्रामस्तरावर ब्लिचिंग पावडरचा पुरवठा, संसर्गजन्य आजारांची पूर्वतयारी, तसेच धोकादायक पूल, मोबाईल नेटवर्क, विजेचा स्थिर पुरवठा यांचा आढावा घेत संबंधित विभागांना कार्यवाहीसाठी बजावले. उघड्यावर असलेले धान्य पावसामुळे खराब होऊ नये म्हणून तहसील कार्यालयाने दोन नवीन गोदामांसाठी जागा प्रस्तावित करावी, असेही आदेश दिले.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी एटापल्ली येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळेच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेचा आढावा घेतला.

धरती-आबा अंतर्गत सुरू असलेल्या विशेष संतृप्त शिबिरालाही त्यांनी भेट देत तेथील लाभार्थ्यांशी संवाद साधला. १५ ते ३० जूनदरम्यान सुरू असलेल्या या शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

शासनाच्या योजना प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत का, याची खातरजमा करत जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला उद्दिष्टपूर्तीसाठी अधिक सक्रिय आणि उत्तरदायी राहण्याचे निर्देश दिले.