गडचिरोली-आरमोरी महामार्गावर वाढते अपघाताबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाला ‘कारणे दाखवा’ नोटीस..

२४ तासांत उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा!...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १६ ऑक्टोबर : सततच्या अपघातांनी ‘मृत्यूचा सापळा’ ठरू लागलेल्या गडचिरोली–आरमोरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सीच्या दुरवस्थेवर अखेर जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना थेट ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून २४ तासांत खुलासा सादर करण्याचा आदेश दिला आहे. वारंवार अपघात होऊन नागरिकांचे जीव गमवावे लागत असताना विभागाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, स्पष्टीकरण न दिल्यास शिस्तभंगविषयक तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही दिला आहे.

१४ ऑक्टोबर रोजी ज्युबिली शाळेजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या तपास अहवालानुसार रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खोल खड्डे, रोड शोल्डरवरील झुडपे आणि अपुरी दृश्यमानता यांमुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात वाढले आहेत. रस्त्याची फक्त सात मीटरची रुंदी दोन अवजड वाहनांसाठी धोकादायक ठरत असून, वाहतूक वाढ लक्षात घेता रस्त्याचे रुंदीकरण आणि मध्यभागी मीडियन बांधणी अत्यावश्यक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, रस्त्याच्या कडेच्या १.४ मीटर शोल्डरचे भरणे व समतल करणे, वाढलेली झाडे-झुडपे काढून दृश्यमानता वाढवणे, आणि धोकादायक वळणांवर सुरक्षा फलक व वेगमर्यादा दर्शक बोर्ड बसवणे या बाबी तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी विशेषतः शाळा, रुग्णालये आणि वर्दळीच्या चौकांसारख्या संवेदनशील ठिकाणी आयआरसी मानकांनुसार सुरक्षा फलक, ब्लिंकर्स व रम्बलर स्ट्रिप तात्काळ बसवण्याची सक्त ताकीद दिली आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे.

Armori road
Comments (0)
Add Comment