लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. २६ : आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी आज निवडणूक व्यवस्थेची सविस्तर पाहणी केली. त्यांनी कृषी महाविद्यालयातील मतदान यंत्र सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रुम) तसेच क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ईव्हीएम साठवणूक कक्षाला भेट देऊन सुरक्षेसह सर्व तांत्रिक व्यवस्थेचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी पंडा यांनी सर्वप्रथम स्ट्राँग रुमची पाहणी करून राज्य निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या सुविधा कार्यान्वित आहेत की नाहीत, याची तपासणी केली. विशेषतः सीसीटीव्ही प्रणाली, अग्नीरोधक उपाययोजना, डबल-लॉक व्यवस्था आणि रस्तोरस्ती सुरक्षा या सर्व बाबींवर त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. परिसरातील बाह्य सुरक्षा तसेच प्रवेशबिंदूवरील तपासणी यंत्रणेचेही त्यांनी निरीक्षण केले.
यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी ईव्हीएम साठवणूक कक्षाची पाहणी करून सुरक्षा अलार्म, अग्निशामक यंत्रणा, प्रकाश व्यवस्था व विद्युतपुरवठ्याची उपलब्धता याची खात्री केली. मतमोजणीच्या दिवशी परिसरात होणारी गर्दी प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी वाहतूक नियोजन, पोलीस बंदोबस्त आणि प्रवेश-निर्गम व्यवस्था याबाबत दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित समिती सदस्यांशी सविस्तर चर्चा केली.
या पाहणीदरम्यान अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक गोकुळ, गडचिरोली नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे तसेच संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.
हे देखील वाचा,
गडचिरोलीतील तिन्ही पालिका निवडणुका ‘स्टे’च्या उंबरठ्यावर — आरक्षणाचा स्फोट, उमेदवारांची झोप उडाली
३ किमीचा रस्ता ‘ठप्प’; अहेरी–प्राणहिता मार्ग प्रशासनाच्या दिरंगाईचा राष्ट्रीय नमुना
संविधान मूल्ये कृतीत उतरविण्याची गरज : डॉ. पुरणचंद्र मेश्राम