लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी – सिद्धार्थ सांबरे
पालघर, दि. २४ मे : कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. त्यामुळे कर्ता व्यक्ती कुटुंबातुन कायमचा निघुन गेल्याने कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुलांचे शिक्षण सुरू असतांनाच किंवा मुलं लहान असतांनाच काहींना तर कोरोनाच्या संसर्गामुळे कायमचे पालक गमवावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे भविष्यात संगोपन, शिक्षण व संरक्षण कसे केले जाईल.? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ह्याच त्यांच्या उद्भवलेल्या परिस्थितीला मदतीचा हात देण्यासाठी पालघर जिल्ह्याचे प्रशासन सरसावले असून त्यांनी दोन्ही पालक किंवा एक कमावता पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी कृती दलाची (Task Force) स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी चाईल्ड लाईन १०९८ या क्रमांकावर संपर्क साधून गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे.
चाईल्ड लाईन १०९८ ची माहिती फलक सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बाल कल्याण समिती अध्यक्ष, आयुक्त, महानगरपालिका, पोलीस आयुक्त अधिक्षक (ग्रामीण), सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अध्यक्ष, जिल्हा बाल कल्याण समिती, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील बालगृहे करीता तात्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात यावे, येथील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी यावेळी दिल्या.
कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होतेवेळी आपल्या बालकाचा ताबा कोणाकडे द्यावा ही माहिती रुग्णाकडून भरून घेण्याबाबत सर्व रूग्णालयांना निर्देश दिले आहेत.
कोरोनामुळे बालकाला काळजी व संरक्षणाची कुठलीही गरज भासत असल्यास सेव द चिल्ड्रन्स 7400015518, 8308992222 अध्यक्ष, बाल कल्याण समिती, पालघर 7020322411, 9823561952 जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पालघर 9923397362, 9890853282 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
या टास्क फोर्सचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदस्य सचिव तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन चाईल्ड लाईन १०९८ व पोलीस संपर्क क्र १०३ अथवा
८३०८९९२२२२ (सकाळी ८.०० ते रात्री ८.००)
७४०००१५५१८ (सकाळी ८.०० ते रात्री ८.००) यांना तात्काळ कळवावे.
हे देखील वाचा :
पोलीस पाटीलांच्या कुटुंबावरच गावकऱ्यांचा बहिष्कार, १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल