लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर : सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ते 21 फेब्रुवारी 2025 या दरम्यान हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने दि. 10 फेब्रुवारी रोजी या मोहिमेचा शुभारंभ जि.प. उच्च प्राथमिक शाळा अजयपूर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजयपुरच्या सरपंच नलु तलांडे, तर प्रमुख अतिथी म्हणून जागतिक आरोग्य संघटनाचे राज्य समन्वयक डॉ. समाधान देबाजे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रकाश साठे, हत्तीरोग अधिकारी डॉ. प्रतीक बोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मुनेश्वर, वैद्यकीय अधिकारी डॉ.चौधरी, उपसरपंच बंडू निखाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकुमार सोयम, मुख्यध्यापिका श्रीमती वनकर, जिल्हा समन्वयक राखी झाडे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे म्हणाले, प्रत्येक नागरिकांना या मोहिमेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या गोळ्या प्रत्यक्ष खाऊ घालण्याचे काम आरोग्य यंत्रणेने करावे. तसेच फक्त आकडेवारीवर न जाता 100 टक्के लोकांना समक्ष गोळ्या खाऊ घालाव्यात व हो मोहीम यशवी करावी. डॉ. महादेव चिंचोळे म्हणाले, सर्व पात्र नागरिकांनी हत्तीरोगाचे दूरीकरण करण्याकरीता प्रत्यक्ष गोळ्या खाणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या समक्ष गोळ्या खाल्याची खात्री प्रत्येक कर्मचा-यांनी करून घ्यावी. तेव्हाच ही मोहीम यशस्वी होईल. तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गोळ्या खाऊ घालून करण्यात आले.
प्रास्ताविक जिल्हा हिवताप अधिकारी डॉ प्रकाश साठे म्हणाले, 10 तालुक्यातील 1030 गावात व 92 वार्ड मध्ये हत्तीरोग औषधोपचार मोहीम राबविण्यात असून 11 लक्ष 94 हजार 357 लोकसंखेला गोळ्या खाऊ घालण्यासाठी 1460 चमू तयार करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन नितेश मोगरकर व नागेश सुखदेवे यांनी तर आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुनेश्वर यांनी मानले.