जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक संपन्न

आरोग्यविषयक सोयी-सुविधांचे विहित वेळेत नियोजन करण्याचे निर्देश- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर  : जिल्ह्यातील कोरोनाजन्य स्थिती लक्षात घेता आरोग्य सुविधा अधिक बळकट व्हावी, यासाठी उपलब्ध औषध साठा, आवश्यक मनुष्यबळ,लसीकरण व आरोग्य विषयक सोयी सुविधाचे विहित वेळेत नियोजन करून ठेवावे असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिलेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त राजेश मोहिते,पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, अधिष्ठाता डाॅ.टेकाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

ब्रह्मपुरी, मूल व गोंडपिपरी तालुक्यातील 475 ऑक्सिजन पॉईंटचे काम विहित वेळेत पूर्ण करून घ्यावे व स्त्री रुग्णालयातील 350 बेडसाठी लागणारे साहित्य वेळेत मागवून घ्यावेत. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना तपासणी अहवाल 24 तासात मिळायला हवा यासाठी स्वॅब कलेक्शन करण्यासाठी व स्वॅब वेळेत पोहोचविण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ वाढवून घ्यावे अशा सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्यात.

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील उपलब्ध औषध साठा व आरोग्यविषयक सोयी सुविधांची माहिती जाणून घेतली.

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी लसीकरण एकमेव पर्याय असल्याने जिल्ह्यात लसीकरणावर भर दिला जात आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना लसीकरण करता यावे यासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. ज्या कर्मचाऱ्यांचा पहिला डोस व ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे अशांना डोस देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्यासोबतच पत्रकारांना सुद्धा येत्या काही दिवसात लस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

हे देखील वाचा :  सीडॅकमध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर्स, असोसिएट्सच्या ४४ जागा

लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी लसीकरणासाठी ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य हवे आहे यासाठी विभाग स्तरावरून त्यांच्या कार्याचा आदेश काढून घ्यावा व त्या अनुषंगाने दिलेली जबाबदारी, पार पाडत जे काम सोपविले आहे ते पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

हे देखील वाचा : सावधान ! डॉक्टरांना न विचारता कोरोनासाठी औषधी घेऊ नका! एकाच कुटुंबात ८ मृत्यू, ५ अत्यवस्थ!!