एस.टी. कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उत्सवात डीजेचा धिंगाणा — प्रशासन गप्प!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : शिस्त, वेळेचे भान आणि जनतेला सेवा देण्याची जबाबदारी पाळणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) कर्मचाऱ्यांकडूनच नियमांची पायमल्ली झाली. गडचिरोली एस.टी. डेपोच्या आतील परिसरात एका वरिष्ठ कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचा उत्सव साजरा करताना जवळपास दीड तास कर्णकर्कश डीजेवर नाच-धिंगाणा घालण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिक, शासकीय कार्यालये आणि प्रवासी हैराण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, एस.टी. आगाराचे उपाध्यक्ष संतराज रामचंद्र कलिये यांच्या सेवानिवृत्ती व वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांनी फलाटावर गाड्या उभ्या करून डीजेचा कर्कश आवाज सुरु केला आणि नृत्यात दंग झाले. त्यावेळी अनेक विद्यार्थी व प्रवासी गाड्यांसाठी ताटकळत उभे होते, परंतु त्यांच्या सोयीकडे कोणी लक्ष दिले नाही. तहसील कार्यालय आणि पंचायत समितीपर्यंत हा गोंगाट पोहोचल्याने अधिकाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला.

या प्रकाराबाबत डेपो प्रबंधक अतुल रामटेके आणि जिल्हा नियंत्रक अशोक वाढीभस्मे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. डीटीओ व्यवहारे यांना विचारणा केली असता त्यांनी “माहिती घेतो” एवढेच सांगून फोन ठेवला. सुरक्षा रक्षकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “अशा प्रकारचा डीजे वाजवत नाच-धिंगाणा आम्ही कधीच पाहिला नाही. हा प्रकार अतिशय लाजिरवाणा आहे.”

शिस्तबद्धतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या एस.टी. विभागाकडून असा प्रकार होणे धक्कादायकच आहे. जे कर्मचारी प्रवाशांना वेळेवर सेवा देण्याची जबाबदारी सांभाळतात, त्यांनीच प्रवाशांना ताटकळत ठेवून स्वतःच्या आनंदासाठी नियम धाब्यावर बसवणे हा प्रश्न प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभा करतो.

सध्या या घटनेवर कारवाई व्हावी, संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा प्रवाशांची सेवा करण्याऐवजी वैयक्तिक मेजवानीत मश्गूल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुणीच रोखू शकणार नाही, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे.

During offical time DG partygadchiroli st department