लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्ह्याच्या उत्तर टोकावर वसलेल्या कोरची तालुक्यातील बेतकाठी येथे सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी आयोजित ग्रामसभेत दारूबंदीचा मुद्दा उपस्थित केला. गावातून दारूविक्री बंद करण्याची मागणी केली असता, विक्रेत्यांना विविध शासकीय योजनांसह नरेगाच्या कामापासूनही वंचित ठेवण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
बेतकाठी येथे अवैध दारूविक्री बंदीसाठी गाव संघटनेच्या पुढाकारातून व मुक्तिपथच्या सहकार्याने यशस्वी प्रयत्न करण्यात आले होते. यामुळे काही वर्ष गावातून दारू हद्दपार झाली होती. परंतु, काही नवीन-जुन्या विक्रेत्यांनी पुन्हा अवैध दारू विक्रीचा प्रयत्न केल्याने गावातील वातावरण दूषित झाले आहे. यासाठी गावातील महिलांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. हा प्रश्न कायमचा सोडवता यावा यासाठी नुकतेच गावात आयोजित महिला ग्रामसभेत महिलांनी दारूविक्रीबंदीचा मुद्दा उपस्थित केला.
सोबतच गावातील दारू विक्रेत्यांची यादी देखील ग्राम प्रशासनाला सादर करण्यात आली.
दरम्यान, दारू विक्रेत्यांना धडा शिकविण्यासाठी विक्रेत्यांना राशन बंद, कोणत्याही प्रकारचे दाखले देताना त्यावर दारूविक्री करतात असा शिक्का मारून देण्यात यावा, दारूविक्रेत्यांना नरेगाच्या कामापासून वंचित ठेवावे, गावातील विक्रेत्यांना माहिती व्हावी याकरिता जनजागृती करणे, बाजा बजाओ आंदोलन करून दारूविक्रेत्यांना नोटीस बजावणे यासह गाव विकासाच्या विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच कुंतीताई हुपुंडी, उपसरपंच हेमेंद्र कावडे, ग्रापं अधिकारी देवानंद भोयर, मुक्तिपथ तालुका संघटक निळा किन्नाके यांच्यासह गाव संघटना व बचतगटातील महीला उपस्थित होत्या.