लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी,१४ : “एका आईला वाघाने घेतलं… आणि दोन निरागस नातवंडं रात्रभर उपाशी डोळे दारी बसून राहिली…” अशा शब्दांत देलोडा परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या वेदना मांडल्या. गडचिरोली जिल्ह्यातील देलोडा येथील ही दुर्दैवी घटना ५ जून रोजी घडली. जंगलात मोहटोळ वेचण्यासाठी गेलेल्या मीरा आत्माराम कोवे (५५) या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घातली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर अवघं गाव हबकून गेलं. मृत महिलेचे पती आणि दोन मुलं आधीच काळाच्या पडद्याआड गेले असून, त्या आपल्या सुन आणि दोन अल्पवयीन नातवंडांसाठीच शेवटच्या श्वासापर्यंत झटत होत्या. त्यांचं अचानक जाणं या कुटुंबासाठी प्रलय ठरलं.
या पार्श्वभूमीवर भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी आज १४ जून रोजी देलोडा येथे स्वतः जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. डोळे पुसणाऱ्या आणि कोण बोलावं, कोण समजावं अशा अवस्थेतील कुटुंबियांना त्यांनी उबदार शब्दांत दिलासा दिला आणि तात्काळ आर्थिक मदत सुपूर्त केली.
डॉ. नेते यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि पोर्ला वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याशी थेट संवाद साधून वाघाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. “हे फक्त वन्यप्राण्याचं नव्हे, तर लोकांच्या हक्काच्या जीवनाचा प्रश्न आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
या भेटीदरम्यान भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कवडू बांगरे, ज्येष्ठ नेते खेमराज राऊत, देवराव सयाम, रामदास कोवे, युवा नेते विकास पायडलवार, सविता कोवे आणि गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.