लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली/जयपूर, दि. ६ ऑगस्ट : भारताच्या प्राचीन गणितीय परंपरेला आधुनिक शिक्षणप्रणालीत सश्रद्ध पुनर्प्रतिष्ठा देणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यासाठी ‘गणित गुरु रत्न सन्मान २०२५’ हा भव्य पुरस्कार समारंभ जयपूर येथे मोठ्या दिमाखात पार पडला. राष्ट्रीय स्तरावरील ‘स्किल शिक्ष’ या संस्थेच्या वतीने आयोजित या सोहळ्यात डॉ. अविनाश रमेश चल्लेलवार यांना वेदिक गणित क्षेत्रातील त्यांच्या विलक्षण योगदानासाठी हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वेदिक गणित हे केवळ एक गणनपद्धतीचे शास्त्र नसून भारतीय ज्ञानपरंपरेचे दार उघडणारे तत्त्वज्ञान आहे. आजच्या जलदगतीच्या, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल शिक्षण आणि कौशल्याधारित अध्ययनाच्या युगात शिक्षण अधिक वेगवान, अचूक आणि मूलगामी बनले आहे. अशा काळात वेदिक गणित हे एक प्रभावी व पर्यायी साधन ठरू लागले आहे, जे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विस्तार करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
डॉ. अविनाश चल्लेलवार यांनी मुंबईमध्ये आपल्या संशोधन कार्यकाळात वेदिक गणिताच्या वर्गांना सुरुवात केली आणि नंतर चंद्रपूरमध्ये स्थायिक झाल्यानंतर गडचिरोली व चंद्रपूर विभागात वेदिक गणिताच्या प्रचार प्रसाराचा वसा हाती घेतला. या भागात वेदिक गणिताचे कोणतेही औपचारिक शिक्षण नसल्यानं त्यांनी स्वखर्चाने, विनामूल्य कार्यशाळा, प्रशिक्षण सत्रे आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले. आजवर हजारहून अधिक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन या प्राचीन गणनपद्धतीत प्रावीण्य संपादन करत आहेत.
वेदिक गणितामधील सूत्रांचे प्रभावी अध्यापन, शिक्षणपद्धतीत नवोन्मेष, विद्यार्थ्यांच्या भीतीचे आत्मविश्वासात रूपांतर, आणि एकंदर विचारशक्ती व तर्कशक्ती वृद्धिंगत करणारी त्यांची अध्यापन शैली यामुळे डॉ. चल्लेलवार यांचे कार्य केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे, तर भारतीय गणितीय परंपरेचे संस्कारक म्हणूनही महत्त्वपूर्ण ठरते.
सध्या ते चंद्रपूर येथील राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी येथील गणित विभागात कार्यरत असून शैक्षणिक नवचैतन्याचे वाहक बनले आहेत. त्यांच्या वैदिक गणित विषयक कार्यात संशोधन, प्रशिक्षण कार्यशाळा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शन, अभ्यास मंडळांचे नेतृत्व, तसेच आधुनिक शिक्षणाशी या परंपरेचे साधलेले सुसंवाद यामुळे शिक्षण जगतात एक प्रेरणास्रोत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
वेदिक गणित ही भारतीय संस्कृतीची शाश्वत ज्ञान परंपरा आहे, आणि तिच्या आधुनिक पुनरुज्जीवनासाठी झटणाऱ्या डॉ. अविनाश चल्लेलवार यांना ‘गणित गुरु रत्न सन्मान २०२५’ प्राप्त झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही गौरवाची बाब असून सर्वत्र कौतुक होत आहे..