गडचिरोलीत अमली पदार्थ विकणारा जेरबंद; 90 हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, १६ जून : शहरात मोटारसायकलवरून फिरत गांजाची विक्री करणाऱ्या इसमाला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल ₹९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, अमली पदार्थांच्या गैरव्यवहाराविरुद्ध पोलिसांची कारवाई अधिकच तीव्र झाली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सागर कवडू बावणे (२५), रा. कोटगल, ता. व जि. गडचिरोली हा युवक गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत गांजाची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १५ जून रोजी पोस्टे गडचिरोलीच्या पथकाने त्याला शासकीय पंचासमक्ष ताब्यात घेऊन झडती घेतली.

यावेळी १३,८०० रुपये किमतीचा गांजा, एक मोटारसायकल (₹७५,०००) असा एकूण ₹९०,७०५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.

या कारवाईचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक चव्हाण करीत आहेत. संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोउपनि चैतन्य काटकर व पथकाने केली.

गडचिरोली पोलिसांनी अवैध अंमली पदार्थ बाळगणारे, विकणारे तसेच सेवन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील तरुणाईचा अमली जाळ्यातून बचाव व्हावा, यासाठी अशी कारवाई सातत्याने केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

Durg stapler attestedGadchiroli Durg samginggadchiroli police