दारूच्या नशेत गळफास घेऊन वाहनचालकाची आत्महत्या..

अल्लापल्लीतील फुकट नगरा नगरातील घटना..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली (ता. अहेरी), २५ जुलै : दारूच्या व्यसनाने ग्रासलेल्या आणि कौटुंबिक किरकोळ वादातून एका ३९ वर्षीय युवकाने रागाच्या भरात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आलापल्ली येथील फुकट नगरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृताचे नाव राजू दसरू उसेंडी (वय ३९, रा. फुकट नगर, आलापल्ली) असे आहे. ते सुरजागड येथील एका खाजगी लोहखनिज प्रकल्पात वाहनचालक म्हणून कार्यरत होते. गेल्या काही काळापासून दारूचे व्यसन जळले होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पत्नीशी झालेल्या किरकोळ वादानंतर राजू यांनी नशेच्या अवस्थेत रागाच्या भरात स्वतःच्या राहत्या घरात गळफास लावून जीवनयात्रा संपवली. मृतकाच्या पश्चात पत्नी आणि तीन लहान मुले असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंब उघड्यावर आले असून परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पटले व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह गळफासातून खाली उतरवून उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास अहेरी पोलीस ठाण्यात सुरू आहे.

Aheri PoliceDriver sucide taking alcoholSuicide at allapali