कोरेपल्ली रस्त्याच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी – सामाजिक कार्यकर्ते श्रीधर दुग्गीरालापाटी यांची मागणी..

ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या मिलीभगतीने कोट्यवधींचा निधीवर डल्ला ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भाग १

अहेरी: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कोरेपल्ली रस्त्याच्या कामामध्ये गंभीर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्रीधर दुग्गीरालापाटी यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन झाल्याची माहिती असून, त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. दुग्गीरालापाटी यांनी सांगितले की, शासनाच्या निधीतून ग्रामीण भागात रस्ते बांधून शहरी भागाशी दळणवळण सुलभ करणे हा उद्देश असताना, काही कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची मिलीभगत होत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट होते.

या रस्त्याच्या दर्जामुळे भविष्यात अवघ्या काही महिन्यांतच रस्ता उखडण्याची शक्यता असून, याचा फटका सामान्य ग्रामीण जनतेला बसणार आहे. अनेक ठिकाणी कामात फक्त लिपापोती करण्यात आली असून, संरचनात्मक मजबुतीचा पूर्ण अभाव आहे. त्यामुळे शासनाच्या योजना आणि निधीवरच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

दुग्गीरालापाटी यांनी याप्रकरणी जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक आणि राज्याचे वनमंत्री यांच्याकडे तक्रार सादर करण्याचे ठरवले असून, चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा दिला आहे.

“सामान्य नागरिकांचा पैसा वापरून जर रस्तेच टिकावू राहत नसतील, तर अशा योजनेचा उपयोग काय? दोषींवर कारवाई न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करणार,” असे दुग्गीरालापाटी यांनी ठणकावून सांगितले.

“गाव तेथे रस्ता” या धोरणाअंतर्गत रस्ते निर्माणाच्या नावाखाली केवळ नावापुरते काम करून जनतेची फसवणूक केली जात आहे. रस्त्याच्या मजबुतीसाठी लागणारे निकष पूर्ण न पाळता निकृष्ट साहित्य वापरले जात आहे, आणि संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत,” 

श्रीधर दुग्गीरालापाटी , सामाजिक कार्यकर्ते