राज्यमार्गावर टाकलेल्या चुरा गिट्टीच्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

  • श्वास घेण्यासाठी व रोडवर चालण्यासाठी होते दमछाक
  • आलापल्ली शहरातून एटापल्ली, चंद्रपूर, अहेरी जाणाऱ्या मार्गावर खड्डे आणि धुळीचे साम्राज्य.
  • सा.बां विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने ग्राम पंचायत सरपंच आणि व्यापारी संघटने मार्फत कार्यकारी अभियंता यांना धुळमुक्त करण्यासाठी दिले निवेदन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. १६ मार्च: आलापल्ली-एटापल्ली मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेल्या गिट्टीच्या चुरीमुळे नागरिकांना आणि रोडच्या बाजूला असलेल्या दुकानातील व्यावसायिकांना धुळीचा त्रास होत असल्याने आलापल्ली व्यापारी संघटनेमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम यांना आज निवेदन देण्यात आले.

आलापल्ली हे शहर गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात मोडत असून मध्यवर्ती शहर आहे. या शहरातूनच आलापल्ली-एटापल्ली, आलापल्ली-मुलचेरा, आलापल्ली-चंद्रपूर, आलापल्ली-सिरोंचा, आलापल्ली-भामरागड महामार्ग जोडले आहेत. त्यामुळे शहरात रहदारीचे प्रमाण खूप वाढले आहे. आलापल्ली शहरातून एटापल्ली जाणाऱ्या महामार्गावर (वीर बाबुराव चौक ते खसरा डेपो पर्यत) मोठमोठे खड्डे पडले होते. मागील पावसाळयात या खड्ड्यात गिट्टीचा चुरा टाकून खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र गिट्टीचा चुरा टाकतांना डांबरीकरण न केल्याने धूळ उडून व्यापारी व गावकरी खूप त्रस्त झाले आहे. छोटी-मोठी गाडी या रस्त्यावरून गेली की, धूळ उडून या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना व दुकानदारांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. दुकानात धूळ शिरू लागली आहे. यामुळे अनेकांना दमा व खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे.

त्यामुळे या समस्येचे निराकरण करण्यासाठी व्यापारी संघटनेने ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे धाव घेतली आणि त्वरीत खड्डे आणि रोडवर पसरलेली धूळमुक्त करावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल कुमार मेश्राम आलापल्ली यांच्याकडे निवेदन सादर करून चर्चा केली.  यावेळी सरपंच शंकर मेश्राम, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश गड्डमवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष अमोल कोलपाकवार,व्यापारी संघटनेचे सदस्य राकेश गण्यारपवार आदींची उपस्थिती होती.