लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली २३ जून : “शिक्षण हे केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित नसून, ते भविष्य घडवणारी शक्ती आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये शहरांइतकी गुणवत्ता निर्माण होण्यासाठी शैक्षणिक दर्जा आणि सुविधा पोहचवणं आजची सर्वात मोठी जबाबदारी आहे,” असे स्पष्ट मत राज्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले.
शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाला मुरखळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळेत पार पडलेल्या ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या कार्यक्रमात त्यांनी नवागत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करून शाळेच्या पहिल्या दिवसाचा उत्सव साजरा केला.
शाळेतील नव्या वाटचालीच्या साक्षी होण्यासाठी उपस्थित असलेले शिक्षक, पालक, स्थानिक नागरिक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची ढोलताशांसह मिरवणूक निघाली, आणि शाळेचा परिसर आनंदमय वातावरणाने न्हाऊन निघाला.
या प्रसंगी बोलताना जयस्वाल म्हणाले, “देशाची संपन्नता लोकसंख्येवर नव्हे, तर शिक्षित मनुष्यबळावर ठरते. त्यामुळे गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही दर्जेदार शिक्षणाची हमी देणं ही आमची प्राथमिकता आहे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीसाठी शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते आणि रोजगार यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत भरपूर योजना मंजूर झाल्या असून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा उद्देश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमात १९५० साली या शाळेतील पहिले विद्यार्थी वासुदेव मांदाळे यांचा सहपालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या विशेष क्षणाने कार्यक्रमाला एक भावनिक व ऐतिहासिक अधोरेखा प्राप्त झाली.