लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ७ ऑगस्ट:
आरमोरी-गडचिरोली महामार्गावरील भीषण अपघाताने जिल्हा हादरला असतानाच, दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत दोन जिल्हा प्रमुख थेट भिडल्याची घटना घडली. संपूर्ण जिल्ह्यात एकीकडे हळहळ आणि शोकाचे वातावरण असतानाच, दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या गटबाजीमुळे पक्षातील शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अपघातानंतर मंत्री भुसे यांची तातडीची भेट…
गडचिरोलीजवळील अपघातात चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर शिक्षणमंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतांच्या नातेवाईकांना भेटून सांत्वन केले. जखमींवर एमआयडीसी येथे भेट घेऊन विचारपूस केली असून, दोन जखमींना नागपूरला हेलिकॉप्टरद्वारे हलविण्यात आले आहे.
ग्रामस्थ भावनिक अवस्थेत असताना मंत्र्यांनी थेट संवाद साधत संयमाचे आवाहन केले. “शासन तुमच्यासोबत असून, सर्वतोपरी मदत केली जाईल,” अशी ग्वाहीही दिली. यानंतर जिल्हा परिषद सभागृहात दोन मिनिटे मौन पाळून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली.
संधीपेक्षा संघर्ष? – शिंदे गटातील गटबाजी चव्हाट्यावर…
मंत्री भुसे यांची सर्किट हाऊसमधील बैठक नुकतीच पार पडली असताना, त्यांच्या उपस्थितीतील शांततेनंतर काही मिनिटांतच शिंदे गटाच्या दोन जिल्हाप्रमुखांमध्ये थेट झटापट झाली. माजी जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे आणि नवनियुक्त संदीप ठाकूर यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला.
पदाधिकाऱ्यांसमोरच झालेल्या या वादविवादाने एकमेकांवर धावून जाण्याची वेळ आली. सुदैवाने उपस्थितांनी प्रसंगावधान राखून पुढील अनर्थ टाळला. मात्र या घटनेने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गंभीरतेत गालबोट…
गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यात, एकीकडे अपघाताने ग्रामस्थ संतप्त असताना, दुसरीकडे पक्षांतर्गत विघटनाचे उघड रूप पाहायला मिळाले. पक्षातील शिस्त, नेतृत्वाची पकड आणि प्रशासनातील संदेश यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा संघर्ष पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकतो.