लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: चामोर्शी येथील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २२ वर्षीय अनिकेत गजेंद्र सोनटक्के या विद्यार्थ्याने शिक्षक आणि व्यवस्थापनाकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र, त्याच्या प्रयत्नाने एक विद्यार्थ्याच नव्हे, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतील गंजलेली यंत्रणा उघडी पडली आहे.
अनिकेतने आत्महत्येपूर्वी समाजमाध्यमांवर प्रसारित केलेल्या पत्र आणि व्हिडिओद्वारे केलेल्या आरोपांमुळे व्यवस्थापनाचे आणि शिक्षण विभागाचे बिनधास्त वर्तन, शिक्षकांचा दडपशाहीचा सूर, वसुलीचे राजकारण आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या अनागोंदी कारभाराचा स्फोट झाला आहे. “विरोध केलास, तर नापास करू… वर्गातच अडकवू… प्रश्न विचारलास, तर घालून टाकू!” — हे शिक्षण आहे की छळछावणी?
शेतकरी कुटुंबातील अनिकेतसारखा होतकरू विद्यार्थी जेव्हा थेट आत्महत्येच्या टोकाला पोहोचतो, तेव्हा व्यवस्थेतील संवेदना हरवलेल्या असतात. शिक्षक तुषार भांडारकर, कर्मचारी पवन दुधबावरे आणि व्यवस्थापनाकडून केवळ मानसिक नव्हे, तर आर्थिक शोषण केलं गेल्याचे अनिकेतने थेट आरोपांमधून उघड केलं आहे. दंडाच्या नावाखाली वसूल केलेली रक्कम मौजमस्तीवर उडवली जाते आणि विद्यार्थ्यांचे गुण कमी करून त्यांचं आत्मभान तोडलं जातं — हा प्रकार केवळ अन्याय नव्हे, तर एक शैक्षणिक हिंसा आहे.
या स्फोटक आरोपांनंतर विद्यार्थ्यांनी रुग्णालयाबाहेर जमून संतप्त घोषणाबाजी केली. या छळकथेसाठी जबाबदार शिक्षक, कर्मचारी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करावेत, ही विद्यार्थ्यांची मागणी होती. मात्र, अद्याप पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. डॉक्टरांनीही अनिकेतची मानसिक स्थिती लक्षात घेता ६ जुलैपर्यंत त्याचं निवेदन घेणं टाळलं.
संस्थापक अरुण हरडे यांनी “चौकशी समिती स्थापन करतो, दोषींवर कारवाई करु” असं सांगितलं, पण ही आश्वासनेही अशा घटनांप्रमाणे औपचारिक ठरतील का, असा संशय उपस्थित आहे. कारण शिक्षण क्षेत्रात जबाबदारीच्या नावाखाली अनेकदा थातुरमातुर उपाय योजना केल्या जातात, पण व्यवस्थेतली सडलेली मुळे उपटली जात नाहीत.
हा प्रश्न केवळ एका विद्यार्थ्याचा नाही — हा प्रश्न आहे संपूर्ण ग्रामीण, गरीब आणि शेतकरी वर्गातील मुलांच्या भवितव्याचा. जे शिकायला येतात, पण त्यांना इथे अन्यायाच्या शिकवण्या मिळतात. ही व्यवस्था जर अशाच बेजबाबदारपणे चालत राहिली, तर उद्याचे डॉक्टर, कृषी अधिकारी, संशोधक आणि शास्त्रज्ञ आत्महत्या करतील की व्यवस्थेच्या विरोधात उभे राहतील?
अनिकेतने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नातून फक्त वेदना व्यक्त झाल्या नाहीत — तर व्यवस्थेच्या चेहऱ्यावरचा मुखवटा फाडला गेला आहे. प्रश्न असा आहे की आता तरी प्रशासन, शिक्षण विभाग आणि शासन जागं होईल का? की याही वेळी एखादा निरागस विद्यार्थी या सडलेल्या व्यवस्थेचा बळी ठरेल?