सिंदेवाहीत जबरान जोत शेतकर्‍यांचा एल्गार; राजु झोडे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सिंदेवाही, दि. २८ जून : जबरान जोत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळाली पाहिजे याकरिता वंचित बहुजन आघाडी चे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात सिंदेवाही तहसील कचेरीवर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले.

सिंदेवाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे जंगलालगतचे आदिवासी व गैर आदिवासी शेतकरी पिढ्यान पिढ्या शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. शेत जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे म्हणून येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दावे सुद्धा टाकलेले आहेत.

जिल्हाधिकारी यांच्याकडे दावे प्रलंबित असतांंना व जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांच्या बाजूने आदेश असताना वनविभागाचे अधिकारी गुरुप्रसाद व त्यांचे कर्मचारी शेतकऱ्यांना शेती करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या पिकांची नासधूस करणे, त्यांना मारझोड करणे व धमकावणे असे घाणेरडे व गंभीर कृत्य वन विभागाचे अधिकारी करत आहेत.

या अमानवी कृत्याचा जाहीर निषेध करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी द्वारा तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले.

धरणे आंदोलनात राजू झोडे यांनी वन विभागाचा जाहीर निषेध करून तीव्र संताप व्यक्त केला. वन विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना त्रास देत असतील तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा वन प्रशासनाला दिला.

जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत लढा देत राहणार असे आंदोलनावेळी वंचित बहुजन आघाडी चे नेते राजू झोडे बोलत होते.शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या वन विभागाचे अधिकारी गुरुप्रसाद व त्यांच्या अधिकाऱ्यांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणीही धरणे आंदोलनात करण्यात आली.

धरणे आंदोलनात प्रमुख उपस्थिती वंचितचे जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, देवराव देवतळे, किशोर गुरुकार, मधु गिरडकर, प्रेमदास बोरकर, डॉक्टर प्रेमलाल मेश्राम, सुभाष थोरात, प्रदीप झामरे तथा असंख्य शेतकरी बांधव, युवा वर्ग व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

पुनर्वसनाच्या मागणीसाठी व्यापारी मंडळाच्या धरणे आंदोलनाला प्रारंभ; भामरागड येथील संपूर्ण व्यापार पेठ १०० टक्के बंद

हत्तीरोगापासून बचावाकरीता औषधाचे पूर्ण डोज घ्यावे – जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक

…या महिन्यात सुरु होऊ शकतात महाविद्यालये – उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

 

lead storyRaju Zode