लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २३ मे — महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम जंगलात गुरुवारी सकाळी सुरक्षा दलांनी मोठी कामगिरी केली. कवंडे हद्दीतील इंद्रावती नदीच्या काठावर झालेल्या चकमकीत चार जहाल माओवादी ठार झाले. या कारवाईत पोलिसांनी स्वयंचलित शस्त्रांसह नक्षली साहित्याचा मोठा साठा जप्त केला आहे. उर्वरित माओवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू असून, परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे.
विश्वासार्ह माहितीनुसार, कवंडे परिसरात माओवादी हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अति. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली १२ सी-६० पथके आणि सीआरपीएफच्या एका तुकडीने बुधवारी दुपारी मुसळधार पावसात जंगल परिसरात हालचाल सुरू केली. जवळपास ३०० जवान कवंडे आणि नेलगुंडा येथून जंगलात दाखल झाले.
आज सकाळी शोधमोहीम सुरू असतानाच माओवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवळपास दोन तास चाललेल्या या चकमकीला पोलिसांनीही प्रभावी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर परिसरात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेत चार जहाल माओवादी ठार झाले असून, घटनास्थळी एक SLR, दोन .३०३ रायफल, एक भरमार बंदूक, वॉकी-टॉकी, नक्षल साहित्य आणि छावणीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
चकमकीनंतर पोलिसांनी परिसरात घेराबंदी कायम ठेवली असून, अद्याप काही माओवादी लपून बसल्याची शक्यता गृहित धरून शोधमोहीम सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवादी कारवाया रोखण्यासाठी सुरक्षादलांची ही मोठी मोहीम ठरली आहे. पोलिसांकडून या संदर्भात सविस्तर माहिती लवकरच देण्यात येणार आहे.