लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, : नागरिकांच्या महसूल विषयक अडचणींचे त्वरित निराकरण करून शासकीय सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ अभियानाला आज विविध तालुक्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महसूल मंडळ स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरांमुळे नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक महत्त्वाच्या सेवांचा लाभ मिळत असून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न यामुळे अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसून आले.
या शिबिरांमध्ये महसूल विभागाशी निगडित अनेक प्रलंबित प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. विशेषतः फेरफार प्रकरणांचा निपटारा, महसूल अभिलेखांतील दुरुस्ती, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत विविध सेवा, अकृषक (NA) परवानगीसंदर्भातील मार्गदर्शन, भूसंपादन प्रकरणांतील कागदपत्रांची पूर्तता, ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक नोंदणी तसेच पीएम किसान योजनेविषयी मार्गदर्शन अशा सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. यासोबतच नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्यावरही भर देण्यात आला.
पोर्ला येथे आयोजित शिबिराला जिल्हाधिकारी अविष्यांत पांडा यांनी भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. शासनाच्या सेवा गावपातळीवर पोहोचविणे आणि महसूल विषयक प्रलंबित प्रश्न जलदगतीने सोडविणे हा या अभियानामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल माध्यमातून सेवा अधिक सुलभ होत असून नागरिकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. येथे आयोजित शिबिरात आमदार डा.मिलिंद नरोटे यांनीही उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेतून प्रेरित प्रशासन लोकहिताला प्राधान्य देत आहे, असे सांगत त्यांनी या शिबिरांच्या माध्यमातून सातबारा फेरफारसारख्या सेवांचा लाभ थेट गावपातळीवर मिळत असल्याचे नमूद केले. पात्र लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरणही या उपक्रमातून होत असून डिजिटल प्रक्रियेमुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज जिल्ह्यातील पोर्ला (ता. गडचिरोली), खमनचेरू (ता. अहेरी), कुनघाडा रै. (ता. चामोर्शी), लगाममाल (ता. मुलचेरा), शंकरपूर (ता. देसाईगंज), वैरागड (ता. आरमोरी) आणि कढोली (ता. कुरखेडा) या महसूल मंडळांमध्ये शिबिरे पार पडली. याशिवाय मसेली (ता. कोरची), बामणी (ता. सिरोंचा), मन्नेराजाराम (ता. भामरागड), मुरुमगाव (ता. धानोरा) आणि जारावंडी (ता. एटापल्ली) येथेही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला.
दरम्यान, या अभियानाचा पुढील टप्पा १४ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यातील इतर महसूल मंडळांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये बाम्हणी, पेरमिल्ली, येणापूर, देऊळगाव, मालेवाडा, बेळगाव, पेंटीपाका, ताडगाव, सुरसुंडी आणि कोटमी या ठिकाणांचा समावेश आहे. त्यानंतरही १० एप्रिल, १७ एप्रिल, २४ एप्रिल, ८ मे आणि १५ मे या नियोजित तारखांना जिल्ह्यातील विविध भागांत टप्प्याटप्प्याने शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महसूल विषयक प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी ही शिबिरे प्रभावी व्यासपीठ ठरत असून नागरिकांनी आपल्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.