एटापल्लीचा मशरूम प्रकल्प ‘अफवां’ना छेद देत भरारीवर — दुर्गम भागातील महिलांच्या हातात स्वावलंबनाची नवी किल्ली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील मशरूम उत्पादन प्रकल्प ‘बंद पडला’ असल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांना वास्तवाने जोरदार उत्तर दिले आहे. प्रत्यक्षात हा प्रकल्प केवळ सुरूच नाही, तर नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण क्षमतेने कार्यरत असून पहिल्याच टप्प्यात यशस्वी उत्पादन घेऊन बाजारपेठेत स्वतःची ठोस ओळख निर्माण करत आहे. दुर्गम आणि आदिवासी बहुल भागात उभा राहिलेला हा उपक्रम आता केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता, ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारा आणि महिलांच्या स्वावलंबनाचा प्रभावी पाया ठरत आहे.

मशरूम उत्पादन ही अत्यंत सूक्ष्म, वैज्ञानिक आणि सातत्यपूर्ण देखरेखीची मागणी करणारी शेतीपद्धती आहे. या प्रकल्पात सध्या पुढील उत्पादन टप्प्यासाठी काटेकोर तयारी सुरू आहे. उत्पादन कक्षांचे निर्जंतुकीकरण, उच्च प्रतीचे सबस्ट्रेट व स्पॉन तयार करणे, तापमान आणि आर्द्रतेचे अचूक व्यवस्थापन या सर्व प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने राबवल्या जात आहेत. त्यामुळे प्रकल्प ‘बंद’ असल्याचा दावा हा केवळ गैरसमज असून, वस्तुस्थितीला छेद देणारा आहे, असे कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे.

या उपक्रमाचा सर्वात महत्त्वाचा आणि सकारात्मक पैलू म्हणजे — स्थानिक महिला बचत गटांचे सशक्तीकरण. एटापल्ली परिसरातील अनेक महिलांना या प्रकल्पातून नियमित रोजगार मिळत असून त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होत आहे. जे हात पूर्वी केवळ घरापुरते मर्यादित होते, तेच हात आता उत्पादन, व्यवस्थापन आणि विक्रीच्या प्रक्रियेत आत्मविश्वासाने काम करत आहेत. हा बदल केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक उन्नतीचा स्पष्ट संकेत आहे.

मशरूमला बाजारपेठेत मिळणारा प्रतिसादही तितकाच उत्साहवर्धक आहे. स्थानिक पातळीवर उत्पादित ताजे, गुणवत्तापूर्ण मशरूम ग्राहकांकडून पसंतीस उतरले असून मागणीत सातत्याने वाढ होत आहे. ग्रामीण उत्पादनाला शहरी बाजारपेठेत मिळणारा हा प्रतिसाद, या उपक्रमाच्या यशाचे मोठे चिन्ह मानले जात आहे.

महिला बचत गटांच्या सदस्यांनीही या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करत वास्तव अधोरेखित केले आहे.

“मशरूम विक्रीसाठी कोणतीही अडचण नाही. आम्ही समाधानी आहोत,” असे सरस्वती महिला बचत गटाच्या सदस्यांनी स्पष्टपणे सांगितले.

“गावात सहा मशरूम उत्पादक गट कार्यरत आहेत. आम्ही प्रशिक्षण घेतले असून उत्पादन सुरळीत सुरू आहे,” असे संताजी महिला बचत गटाने नमूद केले.

तर इतर गटांच्या सदस्यांनीही, “शासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध आहेत. उत्पादन व्यवस्थित सुरू आहे, कोणतीही तक्रार नाही,” असे ठामपणे सांगितले.

याच पार्श्वभूमीवर महिला बचत गटांनी नागरिकांना थेट भावनिक आणि व्यवहार्य आवाहन केले आहे — “स्थानिक मशरूमला प्राधान्य द्या. आमच्या उत्पादनाला साथ दिल्यास आमच्या कुटुंबांच्या उपजीविकेला बळ मिळेल.” हे आवाहन केवळ विक्रीपुरते नाही, तर ‘स्थानिकाला साथ’ या व्यापक विचारधारेचे प्रतीक आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनीही नागरिकांना या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन करत, “हा प्रकल्प ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि आर्थिक सक्षमीकरणाचा प्रभावी नमुना ठरत आहे,” असे नमूद केले.

अफवांपलीकडील वास्तव…

एखादा प्रकल्प उभा राहिला की त्याच्यासोबत शंका, अफवा आणि गैरसमजही निर्माण होतात. मात्र एटापल्लीचा मशरूम प्रकल्प हा त्या सर्वांवर मात करत ‘कामगिरी’च्या बळावर उभा आहे. येथे केवळ मशरूम तयार होत नाहीत, तर घडत आहे — स्वावलंबन, आत्मविश्वास आणि ग्रामीण विकासाची नवी कहाणी.

मशरूम
Comments (0)
Add Comment