राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे अगदी लहान लेकरालाही माहीत आहे; सुप्रिया सुळेंचे अजित पवार गटाला प्रत्युत्तर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 1 ऑक्टोंबर : काही आमदारांसह अजित पवार सत्तेत सहभागी झाले आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याचे सांगत करत पक्ष आणि घड्याळ चिन्हावरही दावा केला आहे. हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहचला आहे. आता खरी राष्ट्रवादी कुणाची आणि पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला जात आहे. त्यावरून दोन्ही गट एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अजित पवार एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर भाष्य करताना दिसत आहेत. बहुसंख्य आमदार तुमच्या बाजुने असले तरी तुम्हाला पक्षावर दावा सांगता येणार नाही, असे वक्तव्य अजित पवार करताना व्हिडीओत दिसत आहेत. या व्हिडीओवरून अजित पवार गट आणि शरद पवार गटात आरोप प्रत्यारोप होत आहेत. यावर अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात आणि देशात 80 टक्के लोक अजित पवारांबरोबर आहेत. दोन तृतीयांशपेक्षा अधिक लोक अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह अजित पवारांनाच मिळेल, असा दावा सूरज चव्हाण यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे याला प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट पडली नाही. पक्षात कोणतेही भांडण अथवा वाद नाही. या पक्षाची स्थापना शरद पवारांनी 25 वर्षांपूर्वी केली होती. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अगदी लहान लेकरालाही माहीत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.