७७ वर्षा नंतरही करावा लागतो मांडीभर पाण्यातून प्रवास..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 ब्रह्मपुरी, 20 जुलै – ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेर नवरगाव, भालेश्वर या दोन गावांचा ब्रह्मपुरी ला जाणे – येणे करण्याचा रस्ता ब्रह्मपुरी आणि चिमूर विधानसभा क्षेत्रात येत असून सदर रस्त्यावरून शासकीय, वैयक्तिक, विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेज मध्ये पावसाळ्याच्या मोसमात मोठमोठ्या पडलेल्या खड्डेमय रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामधून ये- जा करावी लागत आहे. त्यामुळे कॉलेज, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल चालवितांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.
सायकलची मोडतोड, पंक्चर झाल्यामुळे, सायकल स्लीप होऊन खाली पडल्यामुळे चिखलाने कपडे भरले, वाहणाऱ्या पाण्याने ओले झाले असता विद्यार्थ्यांना शालेय, कॉलेजच्या शिक्षणापासून त्या दिवशी वंचित राहावे लागते. या रस्त्याची तात्पुरती उन्हाळ्यात डाग डुजी केली जाते.परंतु पावसाळ्यात केली जात नाही ही अ-हेरनवरगाव ,भालेश्वर वाशीय जनतेसाठी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे.

हल्ली ब्रह्मपुरी ते वडसा सरळ जाणारा मार्ग बंद असल्यामुळे ब्रह्मपुरी वरून कुर्झा, अ-हेरनवरगाव, पिंपळगाव, सुरबोडी हा वळण मार्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे सदर मार्गावरील अवघड वाहनासह वाहतूक रहदारीचे प्रमाण खूप वाढलेले आहे. रस्त्यावर पाणी वाहत असल्यामुळे व जागोजागी मोठमोठे खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही तेव्हा एखाद्या दिवशी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ब्रह्मपुरी ते अ-हेरनवरगाव कुर्झा भूती नाल्यावर असलेला पूल हा कालबाह्य झाला असून या पुलावरून अवजड वाहनांची सुरू असलेली वाहतूक ही खूप मोठी या परिसरातील जनतेला डोकेदुखी ठरलेली आहे.

अवजड वाहतुकीमुळे पूल खचून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.तरी प्रशासनाने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांचा उपसा करून रस्त्यावरून पाणी वाहणार नाही आणि रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा जेणेकरून शालेय विद्यार्थी, वाहनधारक, नागरिक, यांना अपघात होण्या पासून दूर ठेवावे अशी या परिसरातील जनतेची मागणी आहे.