आलापल्ली – सिरोंचा या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये दिले होते. तसेच रस्ते विकासाशी संबंधित विषय पाहणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित यंत्रणांना कठोर निर्देश देण्याची मागणी सिरोंचा तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिरोंचा–आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू होऊन तब्बल तीन ते चार वर्षे उलटली, मात्र आजही हा महत्त्वाचा मार्ग अपूर्ण अवस्थेतच आहे. विकासाच्या नावाने सुरू झालेला हा महामार्ग नागरिकांसाठी आता अक्षरशः ‘मरणयात्रा’ ठरत असल्याची तीव्र भावना सिरोंचा तालुक्यातील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. धुळीचे ढग, रस्त्यावर विखुरलेली गिट्टी, अपूर्ण पूल आणि सुरक्षा उपायांचा पूर्ण अभाव यामुळे दररोज शेकडो वाहनचालक जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत.
सिरोंचा पासून सुरू झालेल्या या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात होऊन अनेक वर्षे झाली असली तरी सुमारे १०० किलोमीटरच्या मार्गावर अद्यापही काम पूर्णत्वास गेलेले नाही. काही ठिकाणी केवळ काहीशे मीटर सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूला गिट्टी टाकून मार्ग अपूर्ण सोडण्यात आला आहे. परिणामी या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. जड वाहनांच्या वेगामुळे उडणारी गिट्टी दुचाकीस्वारांसाठी गंभीर धोका निर्माण करत आहे.
याशिवाय अनेक ठिकाणी सुरू असलेल्या पुलांच्या बांधकामांजवळ कोणतेही सावधानता फलक, रेडियम पट्ट्या किंवा बॅरिकेड्स दिसत नाहीत. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी परिस्थिती अधिक धोकादायक बनते. काही महिन्यांपूर्वी बामणी परिसरातील पुलाच्या बांधकामाजवळ योग्य सूचना फलक नसल्याने ट्रॅक्टर खोल खड्ड्यात पडून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तरीही संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांकडून आवश्यक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
सिरोंचा ते उम्मानूर या मार्गावरील अनेक भागात बांधकाम पूर्ण होण्याआधीच सिमेंट रस्त्यावर भेगा पडू लागल्याने कामाच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही ठिकाणी पुलांच्या कामाजवळ मुरूमाचे मोठे ढिगारे, उडणारी धूळ आणि अरुंद रस्ता यामुळे वाहनचालकांना समोरचे वाहन दिसणे कठीण होत असल्याचेही प्रत्यक्ष पाहणीत स्पष्ट झाले आहे. दररोज शेकडो लहान-मोठी वाहने या मार्गावरून प्रवास करीत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता कायम आहे.
या मार्गाच्या निकृष्ट आणि संथ कामाबाबत अनेक राजकीय पक्षांनी तसेच स्थानिक नागरिकांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनीही आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात कामाचा वेग वाढताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
काही काळ कंत्राटदारांकडून वन विभागाच्या परवानगीचा प्रश्न पुढे करून कामात विलंब होत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतरही कामाला गती न मिळाल्याने या विलंबामागील कारणांबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दरवर्षी मुदतवाढ घेत मोठ्या निधीचा वापर होत असल्याचा आरोपही स्थानिक पातळीवर केला जात आहे.
दरम्यान, या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी २०२४ मध्ये दिले होते. तसेच रस्ते विकासाशी संबंधित विषय पाहणारे केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित यंत्रणांना कठोर निर्देश देण्याची मागणी सिरोंचा तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.
विकासाच्या नावाने सुरू झालेला हा राष्ट्रीय महामार्ग आज नागरिकांसाठी संकटाचा मार्ग बनला आहे. कामाच्या निकृष्ट दर्जा, सुरक्षा उपायांचा अभाव आणि वर्षानुवर्षे चालणारा विलंब यामुळे प्रशासन आणि कंत्राटदारांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आता तरी शासनाने ठोस हस्तक्षेप करून कामाला गती देत हा महामार्ग लवकर पूर्ण करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.