लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर: पुण्यातील कोरेगाव प्रकरण जनतेसमोर आले म्हणून तो व्यवहार रद्द झाला आहे. व्यवहार रद्द झाला म्हणजे चोरी झाली नाही अस होत नाही. चोर तो चोर त्यामुळे या प्रकरणी पार्थ पवारवर कारवाई झालीच पाहिजे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
नागपूर इथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते यांनी महायुती सरकारवर टीका केली.पुण्यातील मोक्याची जमीन अधिकाऱ्यांनी दिली, अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आहे तर त्यांच्यावर कारवाई करा. पार्थ पवार याला जमीन सरकारची होती,याची माहिती नव्हती, अस उपमुख्यमंत्री म्हणतात, अस बोलून जबाबदारी झटकता येणार नाही. जमीन परत केली म्हणजे गुन्हा झाला नाही अस होत नाही,चोर निर्दोष ठरवता येतो का? चोरी केली म्हणून त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली.
दुसरीकडे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्थेला शाळेसाठी मीरा रोड येथील जमीन देण्यात आली. ही जमीन अवघ्या चार कोटींमध्ये देण्यात आली जेव्हा त्या जमिनीचे बाजारमूल्य १०० कोटीच्या आसपास आहे. या जमिनीवर आरक्षण होते, ते आरक्षण बदलून सरनाईक यांच्या संस्थेला शाळेसाठी जमीन देण्यात आली. मंत्री,त्यांचे नातेवाईक जमीन लुटत आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली.
मंत्री विखे पाटील यांनी नुकताच शेतकऱ्यांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केले आहे. शेतकरी कर्ज काढतात, बुडवितात अस विखे म्हणाले. विखेंना शेतकऱ्यांचा अपमान करताना लाज वाटत नाही का? शेतकरी कर्जमाफी तुमच्या खिशातून मागत आहे का? शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला तर शेतकरी सरकारकडे काहीच मागणार नाही,शेतकऱ्यांना हमीभाव द्या, पीकविमा द्या..पण मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ होतात आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली की मंत्री अपमान करतात,महायुतीच्या या मंत्र्यांना शेतकरीच जागा दाखवतील अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. येणाऱ्या निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर आघाडी करणार याबाबत विचारले असता आघाडीचे अधिकार हे स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. महायुती मधील पक्ष सोडून इतर पक्षांबरोबर आघाडीबाबत निर्णय स्थानिक पातळीवर होतील,अस वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.