लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ७ ऑगस्ट – शिवसेना (शिंदे गट) मध्ये सत्तेच्या संघर्षाला खुलेपणाने तोंड फुटल्याचे चित्र गडचिरोली जिल्ह्यात पाहायला मिळाले. राज्याचे शिक्षणमंत्री आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी सर्किट हाऊसमध्ये पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर, ते चंद्रपूरकडे रवाना होताच जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
नुकतेच जिल्हाप्रमुखपदी नियुक्त करण्यात आलेले संदीप ठाकूर आणि माजी जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यात वाद विकोपाला गेला. जुना आणि नवा नेतृत्वाचा संघर्ष इतका टोकाला गेला की, प्रत्यक्ष सर्किट हाऊसच्या आवारातच दोघेही एकमेकांवर धावून गेले. जोरदार शाब्दिक चकमकीनंतर हातघाईची वेळ येताच अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत हस्तक्षेप केला आणि पुढील अनर्थ टळला.
या घटनेमुळे पक्षांतर्गत वर्चस्ववाद आता थेट जनतेसमोर आला असून, जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अंतर्गत संघर्ष पक्षासाठी अडचणीचा ठरू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यात सत्ताधारी पक्षातील असे प्रकार सार्वजनिक ठिकाणी घडत असतील, तर पक्षातील शिस्त आणि नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित होतात. एकीकडे मंत्री भुसे जिल्हाभर विकासाचा अजेंडा मांडत असताना, दुसरीकडे पक्षातच असलेली असंतोषाची ठिणगी धगधगणाऱ्या ज्वाळांमध्ये कधी रुपांतरित होईल, याची शंका नाकारता येत नाही.
७० हजारांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील सहायक ACB च्या जाळ्यात
“उद्योगपती नव्हे, देवदूतच! — लॉईड्स मेटल्सकडून अपघातातील जखमींसाठी हेलिकॉप्टर सेवा”