लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरात दोनशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात फिरत असल्याचे प्रथमदर्शनी संकेत मिळाले आहेत. एका नागरिकाने वीजबिल भरणा करताना दिलेली २०० रुपयांची नोट बँकेने बनावट ठरवत बाद केली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात बनावट नोटा प्रसार करणाऱ्या टोळीच्या सक्रियतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, नागरिकांनी व्यवहार करताना अधिक सावधगिरी बाळगावी, असा इशारा जाणकारांनी दिला आहे.
ही घटना १६ जुलै रोजी महावितरणच्या गडचिरोली कार्यालयात घडली. ग्राहकाने थकीत वीजबिल भरण्याकरिता दिलेल्या रकमेतील एक २०० रुपयांची नोट एसबीआय बँकेने स्वीकारण्यास नकार दिला. कारण — ती नोट बनावट होती. बँक अधिकाऱ्यांनी नोटेवर हिरव्या व निळ्या शाईने फुली मारून ती चलनातून बाद घोषित केली आहे.
विशेष म्हणजे, संबंधित ग्राहकाने ही नोट काही दिवसांपूर्वीच एका बँकेतून स्वतःच्याच खात्यातून विड्रॉल केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अशा नोटा कुठून आणि कशा पद्धतीने व्यवहारात येत आहेत, हा प्रश्न अधिक गंभीर ठरतो.
महावितरणने संबंधित ग्राहकास संपर्क करून ती नोट परत केली आणि त्याऐवजी २०० रुपयांची नवी रक्कम स्वीकारली. मात्र, अशा प्रकरणांमुळे सामान्य नागरिकांची आर्थिक हानी होण्याची शक्यता वाढली आहे.
बनावट नोट ओळखण्यासाठी ‘हे’ तपासा…
प्रकाशात धरल्यास महात्मा गांधी यांचा वॉटरमार्क स्पष्ट दिसायला हवा..
नोटेमध्ये एक सुरक्षा धागा (security thread) असतो — तो चांदीसारखा झळकतो आणि त्यावर विशिष्ट अंक दिसतात..
खरी नोट जाडसर आणि उच्च दर्जाची असते. बनावट नोट पातळ, अस्पष्ट आणि फोटो/अक्षरे धूसर असतात..
या प्रकरणातील बनावट नोट ही अतिशय हलक्या कागदावर छापलेली होती. तिच्यावर सुरक्षा धागा नव्हता, महात्मा गांधींचा फोटोही अत्यंत अस्पष्ट होता. त्यामुळे जिल्ह्यात अशा अनेक नोटा आधीच फिरत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘बनावट नोटांचा साखळीप्रकार?’…
या प्रकारामागे बनावट नोटा तयार करून ग्रामीण भागात लपवून-पसरवणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिस यंत्रणांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, यापूर्वी अशा नोटांचा सुळसुळाट सीमेलगतच्या जिल्ह्यांतून झाल्याचे आढळले आहे.
नागरिकांनी काय करावं?
कोणतीही नोट स्वीकारताना शक्यतो प्रकाशाच्या दिशेने तपासावी. नजरेला संशयास्पद वाटल्यास ती तत्काळ बँक किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात सादर करावी. बनावट चलन व्यवहारात अडकणे ही कायदेशीर गुन्हा मानली जाते, याची जाणीव ठेवावी.