लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात दिवसेंदिवस रानटी हत्तींमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून, प्रशासनाच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांच्या समस्या अधिकच वाढत आहेत. मात्र पोर्ला येथील शेतकरी गजानन डोंगरवार यांना याचा अपवाद ठरला. हत्तीच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी केलेल्या तक्रारीची तात्काळ दखल सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी घेत वन विभागाला त्वरित कारवाईचे निर्देश दिले. विशेष म्हणजे केवळ एका तासात नुकसान भरपाई मंजूर करून मदतीचे आदेशही जारी करण्यात आले.
गजानन डोंगरवार यांच्या शेतात काल रात्री हत्तींनी हल्ला करून भातशेतीचा मोठा हिस्सा उद्ध्वस्त केला. या नुकसानीबाबत संबंधित वन अधिकाऱ्यांकडे त्यांनी तक्रार केली होती. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी सहपालकमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला.
डोंगरवार यांनी गडचिरोली विश्रामगृहात सहपालकमंत्र्यांना आपली व्यथा मांडली. निवेदन ऐकून जयस्वाल यांनी स्थानिक वन अधिकाऱ्यांना तात्काळ फोन करून कारवाईचे आदेश दिले. अवघ्या एका तासात प्रशासनाने पंचनामा पूर्ण करून नुकसान भरपाईच्या रकमेचा आदेशही काढला.
याबाबत डोंगरवार यांनी सहपालकमंत्र्यांची पुन्हा भेट घेऊन त्यांचे आभार मानले. “सरकार जर अशी तत्काळ प्रतिक्रिया देत असेल, तर सामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी अॅड. जयस्वाल म्हणाले, “शेतकरी हा आपल्या धोरणाचा केंद्रबिंदू आहे. वन विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबाबत संवेदनशीलता दाखवून त्वरित मदत केली पाहिजे. प्रलंबित अर्जांवरही तत्काळ कार्यवाही करावी, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे.”
या घटनेमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र आले, तर शेतकऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडवता येऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण सध्या जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे.