लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
रवि मंडावार,
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील आणि जिल्हा मुख्यालयापासून तब्बल १८० किलोमीटर अंतरावर असलेले बिड्री गावं अजूनही रस्ते नसलेले, विजेचे-अभ्यासाचे व्यवस्थित साधन नसलेले, आणि नक्षलवादाच्या भीतीने संपूर्ण परिसर थरथरत असलेले गाव. अशा गावातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होत मंत्रालयीन सहायक पदावर पोहोचलेली अश्विनी अशोक दोनारकर ही केवळ एक विद्यार्थीनी नाही, तर संघर्षातून उमललेले फुल आहे.
या गावात जन्मलेली शेतकरी कन्या रोज तीन किलोमीटर पायपीट करून शाळेत जात होती. अभ्यासासाठी ना खासगी शिकवणी, ना आधुनिक साधने. तरीही तिच्या डोळ्यात एकच स्वप्न होते—“शासकीय सेवेत जायचे.” तिच्या जिद्दीने, कठोर परिश्रमाने, आणि आई-वडिलांच्या साध्या पण ठाम पाठिंब्याने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. अनुसूचित जाती प्रवर्गात अंतिम कौशल्य चाचणीत द्वितीय क्रमांक पटकावत तिने स्वतःचे आणि संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.
अश्विनीची कहाणी ही फक्त वैयक्तिक यशकथा नाही, तर नक्षलग्रस्त भागातील शिक्षणाच्या असमानतेवर प्रकाश टाकणारी जिवंत साक्ष आहे. आजही एटापल्ली सारख्या भागात शैक्षणिक सुविधा अत्यल्प आहेत. मुलांना प्राथमिक शाळेनंतर लांब अंतर पार करून माध्यमिक शिक्षण घ्यावे लागते. मुलींसाठी तर हा संघर्ष अधिकच कठीण. रस्ते नसल्याने दळणवळण बंदिस्त; नक्षलवादी सावटामुळे भीती; तर दुसरीकडे दारिद्र्यामुळे लवकर लग्न, कामावर जाणे किंवा शिक्षण सोडणे अशी वास्तवस्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर अश्विनीचे यश हा एक अपवाद ठरतो, पण त्याच वेळी समाज तिच्या यशाने गावात अभिमानाची लाट उसळली आहे. ज्यांच्या दाराशी रोज नक्षल-पोलिस संघर्षाच्या कहाण्या घडतात, जिथे सरकारी सेवकही जायला घाबरतात, त्या गावात आता मंत्रालयीन सहायकपदावर पोहोचलेली एक कन्या आहे. हे केवळ बिड्रीचेच नव्हे, तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे सन्मानचिन्ह ठरले आहे.
तथापि, या घटनेतून शासनालाही एक आरसा दिसतो. जर एका मुलीने अशा प्रतिकूलतेत यश मिळवले, तर योग्य सुविधा, वसतिगृहे, शिक्षकांची उपलब्धता, व शैक्षणिक साधने मिळाल्यास या भागातील शेकडो अश्विनी आपला पल्ला गाठू शकतील. आज नक्षलग्रस्त भागात गरज आहे ती केवळ सुरक्षा धोरणांची नाही, तर शैक्षणिक क्रांतीची.
अश्विनी दोनारकरचे यश हे केवळ “स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलीची बातमी” न राहता, ते ग्रामीण-आदिवासी मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी, त्यांच्या स्वप्नांच्या वाटचालीसाठी, आणि नक्षलवादाविरोधी पर्याय म्हणून शिक्षणाच्या महत्त्वासाठी एक जिवंत प्रतीक ठरते…