अंबानी कार्पोरेट हाऊसवर २२ ला शेतकऱ्यांचा मोर्चा… गडचिरोली जिल्ह्यातून शेकडो शेतकरी होणार सहभागी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, १९ डिसेंबर : दिल्ली येथील रस्त्यांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबई येथे अंबानी कार्पोरेट हाऊसवर काढण्यात येणाऱ्या मोर्चात शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी होणार आहेत.

केंद्र सरकारने किसान विरोधी केलेले कायदे रद्द करुन शेती खाजगी कंपनीच्या ताब्यात जाण्यापासून थांबवावी. स्वामीनाथन आयोग लागू करुन उत्पादन खर्च धरुन ५० टक्के नफ्यासह शेती मालाला हमीभाव जाहीर करावा, या मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि समविचारी संघटनांच्या वतीने २२ डिसेंबर रोजी मुंबई येथील बांद्रा परिसरातील अंबानी यांच्या कार्पोरेट हाऊसवर उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयापासून लाखोंच्या संख्येने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी,प्रहार चे प्रमुख तथा राज्यमंत्री बच्चू कडू,हमाल पंचायत चे बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात काढण्यात येणाऱ्या मोर्चात शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सह चिटणीस भाई संजय दुधबळे,भाई रोहिदास कुमरे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर,भाई सुनील कारेते,भाई दामोधर रोहनकर, भाई प्रदिप आभारे, भाई रमेश चोखुंडे, भाई चंद्रकांत भोयर यांनी केले आहे.