शेतकऱ्यांनी जाहीर केलेल्या सुधारित किमतीपेक्षा अधिक दराने खते खरेदी करू नये – जिल्हाधिकारी दीपक सिंगला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 08 जून : जिल्ह्यात आगामी काही दिवसांत पावसाचे आगमन होईल. त्यामुळे शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाकरिता बियाणे, खते खरेदी सुरु झाली आहे. संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक 21 मे च्या पत्रान्वये रासायनिक खतांच्या कमी झालेल्या किंमतीबाबत कळविले आहे, त्यानुसार खतांच्या किंमती कंपनी निहाय आहेत.

शेतकऱ्यांनी कंपन्यानी जाहीर केलेल्या सुधारित किमतीपेक्षा अधिक दराने खते खरेदी करू नये, बोगस बियाणे, खतांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंग यांनी केले आहे. यासाठी कृषि विभागाकडून जिल्ह्यात 13 भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करतांना दक्षता घेणे आवश्यक आहे.

अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या पावतीसह बियाणे खरेदी करावीत. पावतीवर बियाणाचा संपूर्ण तपशील जसे पिक, वाण, संपूर्ण लॉट क्रमांक, बियाणे कंपनीचे नाव, अंतिम दिनांक खरेदीदाराचे संपूर्ण नाव आदि बाबी तपासून घ्याव्यात. बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. सिलबंद बियाणे पाकिटे खरेदी करावीत.

खरेदी केलेल्या बियाण्याचे पाकीट, मूळ पावती तसेच थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. बियाणे उगवण कमी झाल्यास पेरणी झाल्यापासून दहा दिवसांचे आत तालुका कृषि अधिकारी कार्यालय व पंचायत समिती कार्यालय येथील तक्रार निवारण कक्षात पावतीचे झेरॉक्स जोडूनलेखी स्वरुपात तक्रार करावी.

काही कंपन्यांच्या खतांचे दर वेगळेवेगळे आहे. खरीप हंगामामध्ये आवश्यक रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये खतांच्या दराबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. रासायनिक खते खरेदी करतांना दराबाबत सावधानता बाळगावी. खते खरेदी करतांना आधार कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक सांगून ऑनलाइन प्रणालीव्दारे पॉस मशीनवरच खते खरेदी करावी. जास्त दराने खताची विक्री होत असल्यास कृषि कार्यालयाशी संपर्क करावा असे कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याने अटक

नदीच्या पात्रात पडलेल्या कुटुंबाला वाचवणाऱ्याचाच नदीत बुडून मृत्यू

देशात 26/11 सारख्याच दहशतवादी हल्ल्याची शक्यता!

Collector Deepak Singlalead story