लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई २९ जुलै : राज्यातील कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त विधान करतात, विधीमंडळात रम्मी खेळतात, आणि तरीही सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही — यावर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “कृषिमंत्री धनंजय कोकाटे यांचा राजीनामा न घेणे म्हणजे या सरकारची शेतकऱ्यांविषयीची असंवेदनशीलता आणि ढोंगी सहानुभूतीचं प्रतीक आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
आज मुंबईत पत्रकार परिषदेत वडेट्टीवारांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवताना म्हटलं की, “राज्याचे गृहराज्यमंत्री बार चालवतात, इतर मंत्र्यांकडे पैशाच्या बॅगा सापडतात, आणि सरकार त्यांना पाठीशी घालते. हे मंत्री जर इतकेच ‘पवित्र’ असतील तर त्यांच्यावर गोमूत्र शिंपडून त्यांना अधिक पवित्र करा!’’
“‘लाडकी बहिण’ म्हणायचं आणि बारमध्ये बहिणींना नाचवायचं — महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच न घडलेला हा किळसवाणा प्रकार आहे,” असा घणाघात करताना त्यांनी नागपूरमधील एका बारमध्ये गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “गडचिरोलीचे पालकमंत्री हे स्वतः मुख्यमंत्री आहेत — मग तिथे अधिकारी बारमध्ये फाईल घेऊन काय करत होते?” असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, “एका बाजूला राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत, कंत्राटदार बिलं थकल्यामुळे आत्महत्या करत आहेत, शेतकऱ्यांची ३५ हजार कोटींची थकबाकी बँकांकडे आहे. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हात आखडते, पण शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी खर्चायला तयार आहे. हे दुहेरी धोरण, हे पाषाणहृदय राजकारण आहे.”
राज्यातील सत्तारूढ ‘महायुती’ सरकारमधील अंतर्गत कलहाचाही पर्दाफाश करताना वडेट्टीवार म्हणाले, “महायुती सरकारमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. दोन पक्ष एकमेकांना सहन करत नाहीत. तोंड दाबून मुका मार सहन करायचा याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. सत्तेच्या खुर्चीवर बसून ते लोकशाहीचा अपमान करत आहेत.”