लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली जिल्ह्यातील विविध जनहित योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात, तसेच प्रशासनाच्या ढिसाळ व उदासीन कारभाराविरोधात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली. भ्रष्टाचार, अपारदर्शक भरती प्रक्रिया, अपूर्ण पाणीपुरवठा योजना आणि MNREGA अंतर्गत खोट्या कामांचे प्रकरण यांसह अनेक तक्रारींसंदर्भात सतत निवेदने देऊनही कारवाई न झाल्यामुळे अखेर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
उपोषणस्थळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी स्वतः हजेरी लावून उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांना समर्थन देत “हा लढा योग्य असून, मी स्वतः या प्रश्नांचा पाठपुरावा करणार,” असा विश्वास दिला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, डॉ. भारत खटी, वासुदेव शेडमाके, अनिल कोठारे, सतिश विधाते आदी मान्यवर उपस्थित होते.
आंदोलनाची प्रमुख कारणं — ‘शासनाच्या मौनाला उत्तर देणारा आवाज’..
> ● अहेरी अंगणवाडी सेविका भरतीतील अपारदर्शकता: पात्र उमेदवार डावलून भरती प्रक्रियेवर पक्षीय दबाव असल्याचा आरोप, परंतु आजवर कोणतीही चौकशी नाही.
● नागेपल्ली-आलापल्ली जलसंपदा संकट: निकृष्ट दर्जाच्या पाईपलाइनमुळे पाणीपुरवठा खंडित; चौकशीचा विषय वर्षभरांपासून प्रलंबित.
● भामरागडमध्ये MNREGA गैरव्यवहार: माणूस न गेलेल्या डोंगरात खोट्या कामांचे दाखले, निधीची उचल, परंतु अद्याप कोणतीही कारवाई नाही.
● डुप्लिकेट कामांचे हिशेब: एकाच कामासाठी विविध खात्यांतून अनुदान; कोणत्याही कामाचा बोर्ड/फलक नाही.
● जलजीवन मिशनमधील अपयश: पूर्ण झाल्याचा दाखला असूनही अनेक गावांत नळातून पाणीच नाही. उलट पाइपलाइनमुळे रस्त्यांचीही हानी.
● ग्रामपंचायतींकडून सातत्याने निवेदने: प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप.
राजकीय एकवटणाऱ्या भावना, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर रोष…
आंदोलन स्थळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी एकाच मागणीसाठी एकवटलेले दिसले. प्रशासनाच्या डोळ्यांसमोरच प्रश्नांचे ढीग मांडण्यात आले, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढतो आहे. आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला की, “आता शांत बसणार नाही, लढा तीव्रच करणार.” विशेष म्हणजे, राजकीय विरोधकांबरोबरच सत्ताधारी पक्षाचे नेतेही या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याने, या लढ्याचे राजकीय पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता आहे.
‘जनकल्याण’च्या नावाखाली झालेल्या गैरप्रकारांचा जाहीर पंचनामा..
गडचिरोलीतील अनेक योजना कागदोपत्री पूर्ण झाल्या, निधी खर्च झालेला दाखवला, पण प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत सुविधा पोहोचल्याच नाहीत. यामुळे जनतेचा शासनावरचा विश्वास डळमळीत झाला असून, ‘शासनाच्या मौनाला आता आंदोलनाच्या आवाजाने उत्तर देण्याची वेळ आली आहे’ असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर हे आंदोलन जिल्ह्यातील जनतेच्या भावना प्रतिबिंबित करणाऱ्या तीव्र जनआंदोलनात परिवर्तित होईल.