३ ऑगस्टला गडचिरोलीत ‘कष्टकऱ्यांचा उत्सव’ — शेकापच्या ७८व्या स्थापना दिनानिमित्त भव्य मेळावा

बहुजनांच्या हक्कांसाठी नव्याने रणभेरी; नवेगाव येथे निर्धार, नेतृत्व आणि नवसंघटनाचे महामंच...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली: ही केवळ पक्षाची वर्षगाठ नाही, तर जनतेच्या हक्कांची पुनःप्रतिष्ठा करण्याचा दिन! राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी, आदिवासी, भटके-विमुक्त आणि ओबीसी बहुजन जनतेच्या हक्कांबाबत सातत्याने आवाज उठवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या ७८व्या स्थापना दिनानिमित्त दिनांक ३ ऑगस्ट, रविवार रोजी गडचिरोली तालुक्यातील नवेगाव येथील प्रसन्न सेलिब्रेशन लॉनमध्ये दुपारी १२ वाजता ‘कष्टकऱ्यांचा उत्सव’ म्हणून भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात समाजाच्या सर्वसामान्य घटकांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडली जाणार आहे. शेतकऱ्यांना हमीभावाचा न्याय, विधवा-निराधार महिलांची सन्मानपूर्वक जीवनवाट, भूमिपुत्र बेरोजगारांचे दुर्लक्षित प्रश्न, शेतमजुरांचे हक्क, आणि भटक्या-विमुक्तांवरील अन्यायकारक आरक्षण कपात — हे विषय या मेळाव्याच्या केंद्रस्थानी असणार आहेत. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या सामाजिक आणि राजकीय समिकरणांची दिशाही येथे मांडली जाणार आहे.

या मेळाव्यात भाई राहुल देशमुख (राज्य सरचिटणीस, शेकाप), साम्याताई कोरडे (विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्षा), भाई रामदास जराते (आदिवासी, भटके-विमुक्त आघाडी), भाई श्यामसुंदर उराडे (मध्यवर्ती समिती सदस्य), जयश्रीताई जराते (महिला नेत्या), काॅ. अमोल मारकवार (जिल्हा सचिव, माकप), राज बन्सोड (जिल्हाध्यक्ष, आझाद समाज पक्ष) यांच्यासह इतर अनेक जाज्वल्य नेते उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यातून केवळ मागण्यांचा घोष होणार नाही, तर नवा आत्मविश्वास, नवसंघटन आणि नवनेतृत्वाचा उदयही होणार आहे. ही लढाई केवळ ‘सत्ता’साठी नव्हे, तर ‘हक्काची सत्ता जनतेकडे’ यासाठी असणार आहे.

या मेळाव्यासाठी शेकापच्या गडचिरोली जिल्हा सरचिटणीस संजय दुधबळे, जिल्हा समिती सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, अक्षय कोसनकर, रमेश चौखुंडे, चंद्रकांत भोयर, चिरंजीव पेंदाम, अशोक किरंगे, पांडुरंग गव्हारे, दामोदर रोहणकर, कामगार आघाडीचे पवित्र दास, रस्ते बाधित आघाडीचे प्रभाकर गव्हारे, शिक्षक आघाडीचे शर्मीश वासनिक, शेतकरी आघाडीचे गोविंदा बाबणवाडे, अल्पसंख्याक आघाडीचे शोएब सय्यद, आदिवासी आघाडीचे रामदास आलाम, भटके-विमुक्त आघाडीचे डंबाजी भोयर, महिला आघाडीच्या कविता ठाकरे व पोर्णिमा खेवले, विद्यार्थी आघाडीच्या अभिलाषा मंडोगडे आणि युवक आघाडीचे गुड्डू हुलके यांनी कष्टकरी जनतेने या ऐतिहासिक मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.