लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. यामुळे राजकीय दिग्गजांची कसोटी लागणार असून, ग्रामीण भागातील सत्तासमीकरण ठरवणाऱ्या या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
केवळ नावाचा बदल…
प्रारूप आराखड्यातील बहुतांश रचना कायम ठेवत केवळ एका गटाचे नाव बदलण्यात आले आहे. मुस्का-डोंगरगावऐवजी आता मुस्का-मुरूमगाव या नावाने गट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे गटातील मतदारसंख्या वा भौगोलिक रचनेत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे तेथील मातब्बर नेत्यांच्या वर्चस्वाला धोका नसल्याचे मानले जात आहे.
आरक्षण सोडती ठरवणार समीकरण…
गट व गण रचना फारशी न बदलल्याने स्थानिक नेत्यांसाठी ही मांडणी अनुकूल असली तरी खरी कसोटी आरक्षण सोडतीनंतर लागणार आहे. कोणाला दिलासा मिळतो, कोणाला धक्का बसतो, यावर आगामी लढतीचे चित्र अवलंबून असेल. ओबीसी आरक्षणामुळे २०२२ पासून खोळंबलेली ही निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर मार्गी लागली आहे.
नवे-तरुण नेते विरुद्ध जुनी परंपरा….
गेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये गडचिरोली-चिमूर मतदारसंघात काँग्रेसने मुसंडी मारली आहे, तर गडचिरोली व अहेरी विधानसभा महायुतीकडेच आहेत. धर्मरावबाबा आत्राम यांना वगळता खा. डॉ. नामदेव किरसान, आ. रामदास मसराम आणि आ. डॉ. मिलिंद नरोटे हे सर्वच प्रथमच निवडून आलेले असल्याने, ग्रामीण भागात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. दुसरीकडे आत्राम यांनी आतापासूनच बैठकांचा सपाटा लावत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
नगर परिषदा व नगरसेवकांची वाढलेली संख्या…
जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी नगर परिषदांमध्ये लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या वाढवण्यात आली आहे. रिकाम्या जागांवर नवे वसाहती उभ्या राहिल्याने काही प्रभागांचे क्षेत्रफळ कमी झाले असून प्रभागांची संख्या वाढली आहे. उदाहरणार्थ,
गडचिरोली नगरपरिषद : नगरसेवक पूर्वी १५, आता २७
देसाईगंज : नगरसेवक पूर्वी १९, आता २१
आरमोरी : नगरसेवक पूर्वी १७, आता २०
तालुकानिहाय प्रभाग रचना
कोरची : २ प्रभाग, ४ सदस्य
कुरखेडा : ५ प्रभाग, १० सदस्य
धानोरा : ४ प्रभाग, ८ सदस्य
अहेरी : ६ प्रभाग, १२ सदस्य
सिरोंचा : ४ प्रभाग, ८ सदस्य
ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत…
गडचिरोली जिल्हा परिषदेला ग्रामीण भागातील विकासाचे मिनी मंत्रालय मानले जाते. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक मुद्दे — पायाभूत सुविधा, रस्ते, आरोग्य, शिक्षण — यावर जोर राहणार आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे आता सर्वांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले असून त्यानंतरच खरी निवडणूक रंगणार आहे.