अखेर जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचेवर कारवाईचे सावट: शेतकरी कामगार पक्षाच्या तक्रारीची मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी घेतली दखल!

गडचिरोली, दि. ११ डिसेंबर : गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दिपक सिंगला हे शेतकरी, कष्टकरी – कामगार आणि सामान्य जनतेच्या संबंधातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी यांचे पाठपुरावे आणि पत्र, निवेदने, तक्रारी यांचेकडे दुर्लक्ष करून अवैध कारभाराला वाव देवून जिल्हा विकासाला अडथळा ठरत असल्याने त्यांची गडचिरोली येथून तात्काळ बदली करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, शेकाप युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे आणि मुख्य सचिव यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेण्यात आली असल्याने जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचेवर कारवाईचे सावट निर्माण झाले आहे.

आज दुपारी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव डॉ.नितीन करीर यांना याप्रकरणी योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचेवर बदलीची कारवाई अपेक्षित असून सदर कारवाईस विलंब झाल्यास मंत्रालयासमोर शेतकरी कामगार पक्षातर्फे लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, शेकाप युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर यांनी दिली आहे.