अखेर इंजेवारी परिसरातील नरभक्षक बिबट्या जेरबंद

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

आरमोरी दि,११ : आरमोरी वनपरिक्षेत्रातील इंजेवारी आणि देऊळगाव परिसरात गेल्या महिन्याभरापासून सक्रिय असलेला आणि दोन महिलांवर हल्ला करून त्यांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांत भीती निर्माण करणारा बिबट्या अखेर गुरुवारी सकाळी जेरबंद करण्यात आला.

१९ नोव्हेंबर रोजी देऊळगाव तर २ डिसेंबर रोजी इंजेवारी येथे या बिबट्याने हल्ले केले होते. मानवी जीवितास धोका निर्माण झाल्याने नागरिकांनी पकड मोहिम राबविण्याची मागणी केली होती. मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांच्या आदेशानंतर वडसा वनविभाग अंतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आली.

उपवनसंरक्षक वरुण बी.आर., सहाय्यक वनसंरक्षक आर.एस. सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण आर. बडोले यांनी पथकाचे नेतृत्व केले. मोहिमेत RRT गडचिरोलीसह वडसा वनविभागातील कर्मचारी सहभागी होते. शोधासाठी २५ ट्रॅप कॅमेरे, ५ सीसीटीव्ही लाईव्ह कॅमेरे आणि २ ड्रोनचा वापर करण्यात आला.

गुरुवारी सकाळी RRT पथकाने बिबट्याला बेशुद्ध (Tranquilize) करून सुरक्षितरीत्या पकडले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाल टोंगे यांनी तपासणी केली. त्यानंतर बिबट्याला गोरेवाडा प्राणी संग्रहालय व वन्यप्राणी बचाव केंद्र, नागपूर येथे हलविण्यात आले. या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी के.आर. धोंडणे, रवींद्र चौधरी, जीवशास्त्रज्ञ ललित उरकुडे तसेच जलद बचाव पथकातील कर्मचारी भाऊराव वाढई, अजय कुकडकर, मकसूद अली सय्यद, निखील बारसागडे, कुणाल निमगडे आणि गुनवंत बावनवाडे यांनी योगदान दिले. वनविभागाने परिसरातील नागरिकांना अनावश्यकपणे जंगलात न जाण्याचे आवाहन केले आहे.

bibatya rescuedevudgaon bibatya resuce
Comments (0)
Add Comment