लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील मौजा ताटीगुडम (ग्रा.पं. कमलापूर) येथे एका खाजगी विहीरीतून गरम पाणी बाहेर पडत असल्याची घटना संदर्भात लोक स्पर्श न्यूजने सर्वात आधी गरम पाण्याचं रहस्य संदर्भात बातमी द्वारे वेदले होते प्रशासनाचे लक्ष, त्यानंतर प्रशासनाने दखल घेत तपासाअंती हा प्रकार चुनखडकामुळे झालेल्या रासायनिक अभिक्रियेचा परिणाम असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
दिनांक ८ सप्टेंबर रोजी सत्यांना मलय्या कटकु यांच्या खाजगी विहीरीतून गरम पाणी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या चमूने तत्काळ पाहणी केली. सुमारे २० वर्षे जुनी असलेल्या या विहीरीची खोली ७.८० मीटर असून व्यास १.३० मीटर आहे. सहा महिन्यांपूर्वीच या विहीरीचे गाळ काढण्यात आले होते. तपासणीदरम्यान पाण्यात पांढरे कण आढळले तर सबमर्सीबल पंपावर पांढऱ्या थराचे अस्तित्वही दिसून आले.
भूशास्त्रीय अभ्यासातून परिसरात चुनखडक (कॅल्शियम कार्बोनेट) खडक असल्याचे निष्पन्न झाले. विहीरीचे पाणी, सार्वजनिक हातपंप आणि इतर घरगुती विहिरीतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. तपासणी अहवालात गरम पाण्याच्या विहीरीत कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा तब्बल ९२३ मि.ग्रॅ./लिटर असल्याचे आढळून आले.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद उद्धरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी गाळ काढल्याने विहीरीच्या पाण्याचा संपर्क जमिनीखालील चुनखडकातील कॅल्शियम ऑक्साइडशी आला. पाणी व कॅल्शियम ऑक्साइड यांच्या मिश्रणामुळे उष्माक्षेपी रासायनिक अभिक्रिया (एक्झोथर्मिक रिऍक्शन) होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साइड तयार झाले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली. परिणामी विहीरीतील पाणी गरम झाले, असा निष्कर्ष भूशास्त्रीय अभ्यासातून काढण्यात आला आहे.
या घटनेनंतर परिसरात मोठी चर्चा रंगली असून, स्थानिक ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सहा महिन्यांपासून विहिरीतून गरम पाणी? गावकऱ्यांमध्ये कुतूहल, वैज्ञानिक तपासणीची मागणी