लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिरोंचा, दि. ११ जानेवारी: स्थानिक पोलीस व मुक्तिपथने संयुक्त कारवाई करीत मदीकुंठा येथील दारूविक्रेत्यांचा ५० हजार रुपये किंमतीचा गुळाचा सडवा नष्ट केला आहे. याप्रकरणी पाच दारू विक्रेत्यांवर सिरोंचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मदीकुंठा येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी मुक्तीपथ गाव संघटनेच्या महिलांनी यशस्वी प्रयत्न केले. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक काळात दारूची मागणी अधिक राहत असल्यामुळे गावातील दारू विक्रेत्यांनी विविध ठिकाणी जवळपास ८ ड्रम गुळाचा सडवा टाकला होता. यामुळे निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होण्याची शक्यता होती. तर दुसरीकडे दारूमुक्त निवडणूक करण्यासाठी गाव संघटन महिलांनी सुद्धा प्रयत्न सुरु केले आहे. याबाबतची माहिती मुक्तीपथ तालुका चमू व सिरोंचा पोलिसांना लागताच गावातील दारू विक्रेत्यांच्या घरांची तपासणी केली. दरम्यान विविध ठिकाणी ५० हजार रुपये किंमतीचा ८ ड्रम गुळाचा सडवा व दोन लिटर दारू आढळून आली. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी सिरोंचा पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक काळात सिरोंचा पोलिसांनी एकाच गावातील ५ दारूविक्रेत्यांवर कारवाई केल्यामुळे तालुक्यातील दारूविक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांदे यांनी केली. यावेळी मुक्तीपथ तालुका चमू उपस्थित होते.