वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोषीवर कडक कारवाई करून महाराष्ट्रातील मुख्य प्रशासकीय पदावर महाराष्ट्र कॅडरचेच अधिकारी नियुक्त करण्यात यावे – राजु झोडे

उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. २७ मार्च: अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील वनाधिकारी दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी उपवनसंरक्षक शिवकुमार यांच्या नाहक त्रासाला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही बाब महाराष्ट्रासाठी भयंकर धोक्याची असून बाहेरील प्रांताचे कॅडरचे अधिकारी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना समजून घेत नसल्यामुळेच असे भयंकर प्रकरण महाराष्ट्रात घडत आहेत. वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला कारणीभूत विनोद शिवकुमार हे जबाबदार असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

            बाहेरील प्रांताचे वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नियुक्त झालेले आहेत. हे अधिकारी बाहेर राज्यातून आलेले असल्यामुळे यांना महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवर काम करत असताना भाषेचा मोठा अडसर असतो. तसेच सामान्य जनतेच्या भावनेचा व त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मानसन्मानाचा विचार करताना हे बडे अधिकारी दिसत नाही. महाराष्ट्रातील मातीशी हे अधिकारी जुळले नसल्यामुळे त्यांना या प्रांतातील जनतेविषयी तसेच येथील कर्मचारी व अधिकारी यांच्याबद्दल कोणतीही आपुलकी असल्याचे दिसून येत नाही.  

त्यामुळे बाहेरील राज्यातले वरिष्ठ अधिकारी आपल्या अधिकाराचा व पदाचा गैरवापर करून कर्मचारी अधिकाऱ्यांना आपले गुलाम समजतात व मनमानी पद्धतीने त्यांच्याकडून कामे करून घेतात. जर एखाद्या अधिकाऱ्याने थोडाही विरोध दर्शविला तर त्याला गलिच्छ वागणूक देतात व कारवाईच्या धमक्या देतात. महिला अधिकारी किंवा कर्मचारी असल्यास त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत घाणेरडा असतो व त्या दृष्टिकोनातूनच महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांशी व्यवहार करण्याचा प्रयत्न करतात. वरिष्ठ अधिकाऱ्याला घाबरून कित्येक अधिकारी व कर्मचारी कोणासोबत बोलण्यास व तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. जर एखादी अधिकारी अन्याय सहन न झाल्यास वरिष्ठांना कळवितो तर त्याला नाहक त्रास दिला जातो.

त्यामुळेच दीपाली चव्हाण सारखे प्रकरण घडतात आणि निर्दोष अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अशा प्रकरणात बळी जातो. भविष्यात असे प्रकरण पुन्हा घडू नयेत व कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्याला विनाकारण त्रास होऊ नये करिता बाहेर राज्यातील कॅडर चे अधिकारी महाराष्ट्रात नियुक्त करत असताना किमान पाच वर्ष मुख्य अधिकाराचे पद देऊ नयेत अथवा जे बाहेर प्रांतातील कॅडरचे वरिष्ठ अधिकारी नियुक्त आहेत त्यांची महाराष्ट्रा बाहेर बदली करावी या मागणीकरिता राजू झोडे यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Raju Zode