- चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील दाबगाव शेतशिवारातील घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी – अविनाश पोईनकर
चंद्रपूर, दि. २१ एप्रिल: मानव-वन्यजीव संघर्ष सदैव पाहायला मिळतात. सध्या जंगलात मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या आगीमुळे वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. वन्य जीवासाठी उन्हाची दाहकता वाढत आहे. जंगलालगत मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना अनेकदा उघड झालेल्या आहेत. उन्हाची दाहकता व आगीमुळे वन्यजीव गावाच्या आसपास आसरा घेवू लागले आहेत. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात अभयरण्यामुळे मोठ्या प्रमाणात वाघासह अन्य वन्य जीवांचा वावर असून चिचपल्ली वनपरिक्षेत्रात वाघाचा बछडा शेतशिवारातील विहिरीत पडल्याने त्यास वनविभागाने सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. चिचपल्ली वनपरिक्षेत्रात दाबगाव शेतशिवारात आज (ता.२१) दुपारच्या सुमारास सदर घटना घडली आहे.
जंगलातील पाण्याचे साठे वाढत्या उष्णतेमुळे आटत चालले आहे. शिवाय जंगलात लागलेल्या आगीमुळे वन्यजीवांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावाशेजारी पाण्याची सोय तसेच आवश्यक खाद्य उपलब्ध होत असल्याने वन्यजीव गावात येतात. शेत शिवारात शेतकरी आपल्या सोयीसाठी विहिरी, शेत तळे, मच्छीखड्डे तयार करतात. अश्या ठिकाणी वन्यजीव पाण्याच्या शोधात येत असून बर्याचदा अंदाज न आल्याने त्यात वन्यजीव पडून गुदमरल्याच्या घटना घडत आहे. अशीच घटना चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील दाबगाव शेतशिवारात घडली आहे. शेतात पाण्याने तुडूंब भरलेल्या विहिरीत अंदाजे सहा ते सात महिन्याचा वाघाचा नर जातीचा बछडा त्यात पडला. सदर माहिती वन विभागाला प्राप्त होताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र वाघाच्या बछड्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी वनविभागाला चांगलीच कसरत करावी लागली. यात वनविभागातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रक्लापाचे सहा जलद बचाव पथक व वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वरिष्ठ वन अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलद बचाव गटाचे अजय मराठे, डॉ. पडचलवार व त्यांच्या चमूने कॅच पोलच्या सहाय्याने वाघाच्या बछडाला सुखरूप विहिरीतून बाहेर काढले. वाघाच्या बछडाला पिंजरयात टाकून पुढील वैद्यकीय उपचारासाठी चंद्रपूर येथील पशु चिकित्सालयात रवाना करण्यात आले. वाघाच्या बछड्याला वनविभागाने तत्परता दाखवून वेळीच जीवदान दिल्याने त्यांच्या कामगिरीचे होत आहे.
पशु चिकित्सा अधिकारी पदभरती मंजूर असूनही रखडलेलीच
महाराष्ट्र राज्यात चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा हा वनाने व्यापलेला असून वाघासह इतरही वन्यजीवांचे
अस्तित्व मोठ्या प्रमाणात आढळून येते. अंधारी व्याघ्र प्रकल्प, कन्हारगाव व चपराळा अभयारण्य हे
प्रसिध्द आहे. वन्य जिवांची काळजी घेण्यासाठी पशु वैद्यकीय अधिकारी यांची स्थायी
पदे सन – २०१९ साली तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या आदेशाने मंजुरी प्रदान करण्यात
आली होती. प्रशासनाने घेतलेला निर्णय गौरवास्पद असला तरी आजतागायत याठिकाणी सदर
पदभरती झालेली नाही. याकरिता प्रशासनाने वेळोवेळी सकारात्मक निर्णय घेतला असता तर
मानव वन्यजिव संघर्ष रोखण्यास किमान यश आले असते.
वन्यजीवाचे संरक्षण व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने अनुभवी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची रखडलेली पदे भरली असती तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प या प्रसिध्द ठिकाणी काही वन्य जीवाच्या घटनांवर वेळीच उपचार होण्यास साहाय्य झाले असते. सध्यातरी विदर्भातील सर्वच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य, कमलापुरातील हत्ती कॅम्प आदी ठिकाणी अनुभवी पशु वैद्यकीय अधिकारी तज्ञांची गरज आहे.