लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रायगड : जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात गुरुवारी रात्री खैर चोरी प्रकरणी थरारक घटना घडली असून वन विभागाची हलगर्जीपणा आणि अकार्यक्षमता पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. ताम्हाणे-शिर्के परिसरातील जंगलात खैर जातीच्या झाडांची तोड सुरू असल्याची खबर मिळताच वन समिती अध्यक्ष व शिवसेना जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली. सहाय्यक वनसंरक्षक चौबे यांच्या पथकाने छापा टाकला असता आरोपी चार गाड्यांसह घटनास्थळावरून पसार झाले.
वन अधिकाऱ्यांनी जप्त गाड्या घटनास्थळीच उभ्या ठेवून, केवळ टायरची हवा सोडून निघून गेल्याने हा प्रकार चोरट्यांच्या हातात पडलेला संधीचा सोहळा ठरला. रात्रीच्या वेळी चोर पुन्हा आले आणि आपल्या गाड्या उचलून नेत असताना त्यांना नंदू शिर्के यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी चार ते पाच चोरांनी शिर्के यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
या झटापटीत दोन गाड्या परत मिळवण्यात यश आले, मात्र दोन गाड्यांसह आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. या संपूर्ण घटनेत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा ठळकपणे दिसून येतो. जर जप्त केलेल्या गाड्या सुरक्षित ठिकाणी नेल्या असत्या तर चोरांना पुन्हा संधी मिळाली नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुख व वन समिती अध्यक्ष नंदू शिर्के यांनी या प्रकरणी संताप व्यक्त करत म्हटले की, “खैर चोरीच्या व्यवसायाला वन विभागातील काही अधिकाऱ्यांचा मूक पाठिंबा आहे. यामुळेच चोरांची मक्तेदारी दिवसेंदिवस वाढत असून जंगलाचा ऱ्हास होत आहे. माझ्या जीवावर गाडी घालण्याचा प्रयत्न हा वन विभागाच्या ढिलाईमुळेच झाला आहे.”
या प्रकारामुळे म्हसळा तालुक्यात खळबळ उडाली असून जंगलातील खैर चोरीच्या रॅकेटमध्ये कोणाचे संरक्षण आहे, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वन समिती अध्यक्षावर जीवघेणा हल्ला होऊनही आरोपी मोकाट फिरत असल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.