पोटेगाव येथे वन महोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा

गडचिरोली 6 जुन – आज रोजी येथे सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली, वन परिक्षेत्र कार्यालय पोटेगाव तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवड व रोपे वाटप कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, गडचिरोली चे सचिव मा. न्यायाधीश आर. आर. पाटील, पोटेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. अर्चनाताई सुरपाम उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या वतीने सन 2024-25 मध्ये एक पेड मां के नाम (Plant4mother) हि योजना तसेच राज्य सरकारच्या वतीने अमृत वृक्ष आपल्या दारी योजना दिनांक 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभागाच्या रोपवाटीकांमध्ये सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा आणि किमान एक झाड लावून च्याचे संवर्धन करावे असे प्रतिपादन वन परिक्षेत्र अधिकारी श्री. धीरज ढेंबरे यांनी केले.

वृक्षतोडीमुळे होत असलेल्या हवामान बदलांमुळे वाढत असलेली उष्णता आणि अनियमित पाऊस यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे.हवामान बदलास कारणीभूत असलेल्या हरितगृह वायूंना (Green House Gases) शोषून घेण्याचे तसेच जागतिक तापमानवाढ व ओझोन वायूचे कमी होणारे थर नियंत्रित ठेवण्याचे काम वृक्ष व वनांकडून केले जाते. त्यामुळे झाडे लावणे आणि वनांचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरीक्त मुख्य न्यायाधीश आर. आर. पाटील यांनी केले.

तसेच त्यांनी जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण कडून सर्वसामान्य जनतेला उपलब्ध असलेल्या योजना, निःशुल्क विधी सेवा तसेच लोक अदालत बाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.तद्नंतर पोटेगाव ग्रामपंचायत कार्यालय परिसरात अतिथिंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामस्थांना रोपांचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रम गडचिरोली सामाजिक वनिकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्री. गणेशराव झोळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी गडचिरोली सामाजिक वनिकरण परिक्षेत्रातील व पोटेगाव (प्रादे) वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Comments (0)
Add Comment