वनरक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

बल्लारपूर : पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर वनरक्षकाने जबरदस्ती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून, तो सध्या फरार आहे. ही घटना ५ ऑगस्ट रोजी चंद्रपूर-जुनोना मार्गावरील जंगल परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून गावाकडे जात होती. दरम्यान, रस्त्यात दुचाकी बंद पडल्याने दोघेही ती दुरुस्त करत होते. त्याचवेळी एका कारमधून चंद्रपूरहून कारवा येथे जात असलेला ३० वर्षीय वनरक्षक त्यांच्या जवळ थांबला. त्याने पीडितेच्या मित्रास धमकावत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आणि पैशांची मागणी केली.

यानंतर मदतीच्या बहाण्याने तो पीडित मुलीला पुढील गावात सोडतो असे सांगत तिला गाडीत बसवून चंद्रपूर-जुनोना मार्गावरील जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. आरोपीने घटनेनंतर घटनास्थळावरून पलायन केले.

पीडित मुलीने ही माहिती आपल्या मित्राला दिली. त्याने तिला घरी नेले आणि पालकांसह बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी वनरक्षकाविरोधात अप.क्र. ५९२/२५ अन्वये भारतीय दंड संहितेतील कलम ३०८(२), १३७(२), ६४(१), ६५(१) नुसार गुन्हा नोंदवला आहे. आरोपीची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे, पो.ह. यशवंत कुमरे आणि म.पो.अं. खडसे करीत आहेत. आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वनविभागात कार्यरत असलेल्या एका जबाबदार कर्मचाऱ्याकडून असे कृत्य घडणे हे अत्यंत संतापजनक असून, या घटनेमुळे खात्याच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक सेवेत असणाऱ्या व्यक्तींकडून समाजात विश्वास निर्माण होण्याची अपेक्षा असताना, अशा प्रकारच्या घटनांमुळे जनतेच्या मनात प्रशासनाविषयीचा विश्वास डळमळीत होतो.

पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीस तत्काळ अटक करावी आणि न्यायप्रक्रियेमार्फत कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून होत आहे.