राज्यात एसटीच्या विकेंद्रीकरणासाठी ५ प्रादेशिक विभागांची रचना

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून एसटीला मिळणार गतिमान नियोजनाची दिशा...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई, दि. १४ — कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कारभारात आता व्यापक विकेंद्रीकरणाची दिशा घेण्यात आली असून, राज्यभरात पाच प्रादेशिक विभाग स्थापन करण्यात आले आहेत. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे नियोजन, नियंत्रण आणि प्रशासनात अधिक कार्यक्षमता आणि गतिशीलता येणार आहे.

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीसंदर्भात परिपत्रक जारी केले असून, पुढील काही दिवसांत हे प्रादेशिक विभाग आपापली स्वतंत्र कार्यालये सुरू करणार आहेत. मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर आणि अमरावती हे पाच प्रादेशिक विभाग असतील, आणि प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मुख्यालय व त्याअंतर्गत विभाग निश्चित करण्यात आले आहेत.

या नव्या रचनेमुळे स्थानिक स्तरावर वाहतुकीचे नियोजन अधिक परिणामकारकरित्या करता येणार असून, यात्रा-जत्रांमध्ये जादा बससेवा उपलब्ध करणे, प्रवाशांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करणे, आणि महसूल वाढीस चालना देणे शक्य होणार आहे.

सध्या एसटी महामंडळाची त्रिस्तरीय रचना – आगार (तालुका), विभाग (जिल्हा) आणि मध्यवर्ती कार्यालय (राज्यस्तर) – कार्यरत आहे. मात्र, राज्य शासनाच्या महसूल विभागाप्रमाणे विभागीय समन्वयाचे पातळीवरची यंत्रणा नव्हती. या अभावामुळे प्रशासकीय निर्णय थेट केंद्रातून विभागांपर्यंत पोहोचवण्यात अडथळे येत होते. त्यामुळेच सरनाईक यांनी कर्नाटक महामंडळाच्या दौऱ्यावरून प्रेरणा घेत, महाराष्ट्रातील एसटी व्यवस्थापनात अधिक सुसूत्रता यावी या हेतूने प्रादेशिक विभाग रचनेचा निर्णय घेतला.

या विभागांमुळे भूगोलाशी सुसंगत प्रशासन राबवता येईल, वेळेवर सेवा नियोजन करता येईल, तसेच स्थानिक गरजांनुसार निर्णय घेणे शक्य होईल. प्रत्येक विभागात आवश्यक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, वेळेवर आणि सोयीस्कर सेवा मिळवून देण्यासाठी नव्या रचनेतून नियोजन राबवले जाणार आहे.

डॉ. कुसेकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय एसटीच्या सध्याच्या व्यवस्थापनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, भविष्यातील आर्थिक व प्रशासनिक सुधारणा या नव्या विभागरचनेच्या माध्यमातून शक्य होणार आहेत, असे मत परिवहन मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले.

busStसरनाईक