‘ईडी’चा इशारा देत भाजपचे माजी खा.अशोक नेते यांचा काँग्रेसवर निशाणा, जिंदाल प्रकल्पावरून वडेट्टीवारांचे आरोप खोटे

निवडणुकीपूर्वी भाजप-काँग्रेस यांच्यात शाब्दिक युद्ध तीव्र..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्तावित जिंदाल स्टील प्रकल्पावरून निर्माण झालेल्या वादाचे राजकीय पडसाद आता अधिक तीव्र होऊ लागले आहेत. काँग्रेस नेते व विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपचे अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक नेते यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर परखड शब्दांत पलटवार केला.

“बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांवर ईडीमार्फत चौकशी लावायला भाग पडू,” असा थेट इशारा त्यांनी वडेट्टीवारांचे नाव न घेता दिला. त्यांच्या या वक्तव्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

जिंदाल प्रकल्प आणि आरोपांचा रोख..

वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वीच गडचिरोली जिल्ह्यातील सुपीक जमिनी जिंदाल स्टीलला कवडीमोल दराने हस्तांतरित केल्याचा आरोप करत, लीज संपल्यानंतरही नव्याने निविदा न काढता तीच लीज रॉयल्टीवर नव्याने दिली गेल्याचा आक्षेप घेतला होता. इतकेच नव्हे तर, या व्यवहारातून राज्यातील सत्ताधारी तिन्ही पक्षांना महिन्याला प्रत्येकी ‘५०० कोटी’ मिळत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला होता.

भाजपचा बचाव आणि काँग्रेसवर पलटवार…

या आरोपांना उत्तर देताना अशोक नेते म्हणाले, “भाजप सरकारने नवा भूमी अधिग्रहण कायदा आणल्यानंतर शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्याची हमी आहे. त्यामुळे जमिनी कवडीमोलात घेतल्याचा आरोप केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न आहे.”

नेते यांनी वडेट्टीवारांचा थेट उल्लेख टाळत, “असे आरोप करणाऱ्यांचे हात स्वतःच भ्रष्टाचाराने माखलेले आहेत,” अशी बोचरी टीका केली. त्याचबरोबर “जर आरोप बिनबुडाचे ठरले तर ईडीमार्फत चौकशी होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

सत्ताधाऱ्यांतील अंतर्गत सूरमिळवणी की अंतर्गत नाराजी?

या पत्रकार परिषदेला भाजपचे स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्यासह शिंदे आणि अजित पवार गटाचे नेते उपस्थित होते. याच मंचावर अशोक नेत्यांनी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्यावर स्तुतिसुमने उधळत, त्यांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा केली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जयस्वाल यांच्या गडचिरोली दौऱ्यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी नाराजी दाखवत त्यांची आढावा बैठक आणि पत्रकार परिषद वगळली होती. त्यामुळे आज नेत्यांकडून आलेले समर्थन हे नाराजी कमी करण्याचा प्रयत्न मानले जात आहे.

निवडणुका आणि शाब्दिक खडाजंगी..

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना काही महिनेच उरलेले असताना काँग्रेस व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरू झाली आहे. जिंदाल प्रकल्पाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, आणि त्याला उत्तर देताना ‘ईडी’चा इशारा देणारे भाजप नेते – अशा चढत्या राजकीय थेटपणातून जिल्ह्याचे राजकारण कशा वळणावर जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Bjp vs congressGadchiroli politicsJswWadettiwar vs nete