लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या समायोजनाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाला आता राजकीय रंग चढू लागला आहे. तब्बल १९ ऑगस्टपासून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाला जिल्ह्याचे माजी मंत्री अमरीशराव महाराज यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाठींबा दर्शविला.
कर्मचाऱ्यांनी शासनाच्या दुर्लक्षाचा निषेध नोंदवत, दीर्घकाळ सेवा करूनही अद्याप समायोजन न झाल्याची खंत व्यक्त केली आहे. “समायोजनाच्या प्रश्नावर शासनाने तत्काळ निर्णय घेतला नाही तर आरोग्य व्यवस्था कोलमडेल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात डेंगूमुळे सहा नागरिकांचा बळी गेला आहे. ग्रामीण व नक्षलग्रस्त भागात आरोग्य सुविधा आधीच अपुऱ्या असताना, कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिक, विशेषतः दुर्गम भागातील आदिवासी जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
आंदोलन स्थळी भेटीनंतर माजी मंत्री अमरीशराव महाराज म्हणाले, “आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत. शासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. मी स्वतः हा विषय शासनस्तरावर मांडून तोडगा निघावा यासाठी पाठपुरावा करणार आहे. कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.”
आरोग्य सेवांचा प्रश्न हा केवळ कर्मचारी वर्गापुरता मर्यादित नसून, थेट सामान्य जनतेच्या आरोग्याशी निगडीत असल्याने या आंदोलनाकडे जिल्हावासीयांचे आणि प्रशासनाचेही लक्ष लागले आहे. शासनाने वेळ न दवडता ठोस निर्णय घेतल्यासच आरोग्य व्यवस्थेवरील संकट दूर होईल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.