माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आटपाडी दौऱ्यावर येणार, खांजोडवाडी येथील निर्यातक्षम डाळिंब पाहण्यासाठी आटपाडी दौरा निश्चित.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 11 नोव्हे:- देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे शुक्रवार दि. 13 नोव्हेंबर रोजी आटपाडी दौऱ्यावर येत आहेत. प्रतिकूल स्थितीत अनेक प्रयोग करत निर्यातक्षम डाळींबाचे उत्पादन घेणाऱ्या खांजोडवाडी या गावाला भेट देणार आहेत खासदार शरद पवार यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

दुष्काळ, तेल्या बिब्याचे आक्रमण यासह अनेक संकटाशी मुकाबला करत आटपाडी तालुक्याने डाळिंबामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. काही वर्षांपूर्वी टेंभूचे पाणी आल्यामुळे दिलासा मिळाला आहे. परंतु चालू वर्षी कोरोना , लॉकडाऊन आणि अतिवृष्टीमुळे शेती- शेतकरी उध्वस्त झाला. अशा प्रसंगातही आटपाडी तालुक्यात खांजोडवाडी गावाने डाळींबाचे भरघोस उत्पादन घेतले. एकिकडे द्राक्ष आणि डाळिंब उध्वस्त झाल्याचे चित्र असताना खांंजोडवाडीने केलेल्या डाळिंब प्रगतीचे कौतुक म्हणून शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार दुपारी दोन वाजता डाळिंब बागांच्या पाहणीसाठी येत आहेत. खांजोडवाडीचे सरपंच रामदास सूर्यवंशी, प्रगतशील शेतकरी प्रकाशबुवा सूर्यवंशी, प्रतापराव काटे, रमेश सूर्यवंशी, अनिल सूर्यवंशी यांनी बारामती येथे त्यांची भेट घेतली. खासदार शरद पवार यांनी यावेळी आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडी गावाच्या भेटीचा दौरा निश्चित केला.