लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) संयुक्त कारवाईत चार जहाल माओवादी अटक करण्यात आले. हे सर्व माओवादी 11 फेब्रुवारी 2025 रोजी दिरंगी-फुलनार येथील चकमकीत एका सी-60 जवानाच्या हत्येत सक्रिय सहभागी होते. महाराष्ट्र शासनाने यांच्यावर एकूण 40 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
अटक करण्यात आलेल्या माओवादींपैकी दोघे वरिष्ठ पातळीवरील आहेत – सायलु भुमय्या मुड्डेला ऊर्फ रघु, जो दक्षिण गडचिरोली विभागीय समितीचा सचिव आहे आणि जैनी भिमा खराटम ऊर्फ अखीला, भामरागड एरिया कमिटीची सचिव. तसेच भामरागड दलममधील दोन सदस्य, झाशी तलांडी ऊर्फ गंगु आणि मनिला गावडे ऊर्फ सरिता, यांचाही समावेश आहे.
कशी झाली कारवाई?
भामरागड उपविभागातील ताडगाव पोलीस स्टेशन आणि CRPF 09 बटालियनच्या एफ कंपनीने पल्ली जंगल परिसरात माओवादीविरोधी मोहिम राबवली. मोहिमेदरम्यान चार संशयित जंगलात फिरताना दिसले. त्वरित कारवाई करत जवानांनी त्यांना ताब्यात घेतले. प्राणहिता येथे चौकशीत त्यांनी आपली ओळख स्पष्ट केली.
गुन्ह्यांचा इतिहास – भयावह वास्तव.
या चौघांवर मिळून 130 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून यात चकमक, हत्या, जाळपोळ यांचा समावेश आहे. रघुवर 77 गुन्हे, जैनीवर 29, गंगुवर 14 आणि सरितावर 10 गुन्हे आहेत. त्यांचे माओवादी संघटनांमधील कार्यकाळही लांबवलेला असून, त्यांनी अनेक दलांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेली बक्षिस..
सायलु उर्फ रघु: ₹20 लाख
जैनी उर्फ अखीला: ₹16 लाख
गंगु: ₹2 लाख
सरिता: ₹2 लाख
पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
ही कारवाई पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदीप पाटील व पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या यशस्वी कारवाईमुळे माओवाद्यांचे मनोबल खचले आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करुन शांततेच्या प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले आहे.
गडचिरोली पोलिसांची सततची धडक कारवाई.
2022 पासून आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी 96 माओवाद्यांना अटक केली आहे. ही संख्या पोलीस दलाच्या कार्यक्षमता आणि कटिबद्धतेचे प्रतीक
असून सर्वत्र कौतुक होतं आहे..